सातार्डा, आरोस, धाकोरे ग्रामपंचायतींच्या ताफ्यात इलेक्ट्रॉनिक रिक्षा
सातार्डा -
प्लास्टिक कचरा वाहतुकीसाठी सातार्डा, आरोस, धाकोरे गावांमध्ये बॅटरी ऑपरेटर ट्राय सायकल ( इलेक्ट्रॉनिक रिक्षा ) बुधवारी ग्रामपंचायतींच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सरपंचांच्या हस्ते या इलेक्ट्रॉनिक रिक्षांचा शुभारंभ होणार आहे.
सांडपाणी व घनकचरा प्रकल्प अंतर्गत इलेक्ट्रॉनिक रिक्षा सातार्डा, आरोस, धाकोरे ग्रामपंचायतना देण्यात आल्या आहेत.शासनाच्या आराखड्यानुसार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण विभागासाठी सत्तर टक्के व ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोग निधीमधून तीस टक्के निधीतून इलेक्ट्रॉनिक रिक्षा देण्यात आल्या आहेत . शासनाच्या जी ई एम ( GEM ) पोर्टल मधून सुमारे 2 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक रिक्षा प्लास्टिक कचरा वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.सातार्डा, आरोस,धाकोरे ग्रामपंचायतना प्लास्टिक कचरा वाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक रिक्षा शासनाकडून दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.सातार्डा सरपंच बाळू प्रभू, आरोस गावचे सरपंच शंकर नाईक, धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्गाचे कौतुक केले जात आहे.
रिक्षा चालक व सफाई कामगारांसाठी ग्रामपंचायतच्या हालचाली गतिमान
शासनाकडून प्लास्टिक कचरा वाहतुकीसाठी नव्या कोऱ्या इलेक्ट्रॉनिक रिक्षा सातार्डा, आरोस, धाकोरे गावांसाठी देण्यात आल्याने रिक्षा चालक व सफाई कामगार यांच्या नियुक्तीसाठी ग्रामपंचायत कार्यालयांकडून गतिमान हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. रिक्षा चालक व सफाई कामगारांची नियुक्ती करण्यासाठी तसेच प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी ग्रामसभा, मासिकसभेचे प्रायोजन ग्रामपंचायत कार्यालयांकडून करण्यात येत आहे.