राज्यातील यंत्रमागांना वीज दर सवलतीचा अध्यादेश जारी! आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नाला यश
प्रति युनिट 1 रुपये व 75 पैसे वीज दरात सवलत
इचलकरंजी/प्रतिनिधी
वीज सवलतीसाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्राsद्योग विभागाच्या वतीने 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट 75 पैशांची अतिरिक्त व 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट 1 रुपयांची अतिरिक्त वीज सवलत अंमलबजावणी संदर्भातील अध्यादेश सोमवारी (2 सप्टेंबर) जारी करण्यात आला आहे.
दोनच दिवसांपूर्वी आमदार आवाडे यांनी ऑनलाईलन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करुन वीज सवलत अंमलबजावणीचा अध्यादेश आठवडभरात निघेल असे भाष्य आमदार आवाडे यांनी केले होते. या अध्यादेशामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्च 2024 पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेल्या वस्त्राsद्योगाला उभारी मिळण्यासाठी जाहीर केलेल्या वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वस्त्राsद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व वस्त्राद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट 75 पैशांची अतिरिक्त व 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट 1 रुपयांची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील जाहीर घोषणा केली होती. परंतु त्यावेळच्या अध्यादेशात वीज सवलतीसाठी नोंदणीची अट रद्द न करण्यात आल्याने आणि यंत्रमागधारक ही किचकट नोंदणी करु शकत नसल्याने नोंदणीची अट रद्द करावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. नोंदणी अटीमुळे वीज सवलतीचा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अट करण्याबाबत पाठपुरावा करण्याबाबत होत असलेल्या मागणीनंतर नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत नोंदणीची अट रद्द करुन सवलत देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
वीज सवलतीचा अध्यादेश (जीआर) काढण्यात आला नसल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषदेत वीज सवलतीचा जीआर आठवडाभरात निघेल असे भाष्य केले होते. आणि लगेचच जीआर निघाल्याने यंत्रमागधारकांत समाधान व्यक्त होत आहे.