दोडामार्गात भूमिगत वाहिनीद्वारे वीज पुरवठा व्हावा
पालकमंत्री नितेश राणेंकडे करणार मागणी : संतोष नानचे
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग तालुक्यात पावसाळा सुरू झाला की विजेचा लंपडाव सुरू होतो. त्यामुळे तालुक्यातील व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणारी वीज ही भूमिगत वीज वाहिनीद्वारे आणण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे शहरवासीयांतर्फे करण्यात येणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी एका प्रसिद्धपत्रकाद्वारे सांगितले. श्री. नानचे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, दोडामार्ग तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम तालुका आहे. तालुक्यातील मुख्य वीज वाहिन्या या संपूर्ण जंगल भागातून आल्या आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की जरा जरी वादळी पाऊस आला आणि जंगलातील झाडे वीज वाहिन्यांवर कोसळ्यास त्या तुटतात. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील वीज गायब होते. मागच्या काही वर्षात जंगल भागातून आलेली मेन लाइन रस्त्याच्या बाजूने घालावी म्हणून आम्ही वारंवार मागणी केली होती. त्यानुसार गेल्या दोन तीन वर्षांत काम सुरू आहे. अधिकचे कामही झाले आहे. त्यामुळे विजेची समस्या कमी व्हायला हवी होती पण ती अगोदर पेक्षा अधिक तीव्र झाली आहे.
तालुकावासियांचा महावितरण विरोधात रोष वाढत आहे......
जरासा जरी पाऊस कोसळला की तालुक्यातील बरीच गावे दिवसभर अंधारात असतात. कितीही आंदोलने, उपोषण करून देखील महावितरणचा कारभार सुधारत नाही आहे. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अजून पावसाळा सुरू पण झाला नाही आहे आणि बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. हल्लीच्या दिवसांत तर अनेक ठिय्या आंदोलने महावितरणच्या कार्यालयात तालुका वासियांनी केली आहेत.
भूमिगत वीज वाहिन्यांची अत्यंत गरज....
तालुक्यात वाढती लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहता बत्ती गुल होण्याचे प्रकारही संपले पाहिजेत. त्यामुळे तालुक्यात येणारी मेन लाईन ही भूमिगत वीज वाहिन्यांद्वारे आणण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे संतोष नानचे यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री राणे यांचे देखीं ही विजेची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही नानचे यांनी स्पष्ट केले.