For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crime News: विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, आठ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

06:51 PM Jul 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
crime news  विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू  आठ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
Advertisement

आठ महिन्यापूर्वीच नवजितचे लग्न झाले होते

Advertisement

पुलाची शिरोली : विजेच्या धक्क्याने पुलाची शिरोलीत युवकाचा मृत्यू झाला. नवजित महादेव मोंगले (वय २३ रा. सोडगे माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. पुलाची शिरोलीतील सोडगे माळवाडी येथील ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नवजित मोंगले सोमवारी सकाळी शेतातून वैरण घेऊन आला. त्यानंतर जनावरांच्या गोठ्यातील लाईटचा स्विच सुरू करण्यासाठी गेला असता विजेचा शॉक बसला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. नातेवाईक व मित्रांनी त्याला पुलाची शिरोलीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले.

Advertisement

आठ महिन्यापूर्वीच नवजितचे लग्न झाले होते. नोकरीऐवजी आपला व्यवसाय बरा म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी भावाच्या मदतीने सर्विसिंग सेंटर सुरू केले होते. या व्यवसायात त्याने हळूहळू प्रगती करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सोमवारी झालेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास शेकडोंच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते महादेव मोंगले यांचा तो कर्तबगार, शांत व मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. त्याच्या अशा आकस्मित मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे .

Advertisement
Tags :

.