Kolhapur News: विजेच्या धक्क्याने कंत्राटी वायरमनचा जागीच मृत्यू, वारूळमधील घटना
शेती पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करताना वायरमनचा मृत्यू झाला
By : संतोष कुंभार
शाहूवाडी : वारूळ तालुका शाहूवाडी येथील गणेश किसन पाटील (वय 31) या कंत्राटी वायरमनचा विजेचा तीव्र धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. वालूर येथे 11 हजार केव्हीच्या पोलवर काम करत असताना ही दृदैवी घटना घडली. त्याच्या पश्चात पत्नी, सात महिन्याचा मुलगा आणि आई-वडील असा परिवार आहे.
या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीसांत झाली आहे. त्याचे कार्यक्षेत्र नसतानाही त्याला त्या ठिकाणी का पाठवले अशी विचारणा नातेवाईकासह नागरिकांनी केली. त्यामुळे गणेशच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकासह नागरिकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वारूळ येथील गणेश पाटील गेले दीड वर्ष महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून काम करत आहे. त्याच्याकडे निनाई, परळे, बीटमधील गावांचा कार्यभार होता. मात्र मंगळवारी सकाळी त्याला त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील वालूर येथे शेती पंपाचा खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठवण्यात आले होते. 11 हजार केव्हीच्या पोलवर विद्युत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच त्याला विजेचा जोराचा शॉक बसला, यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला.