For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणकुंबी भागातील वीज समस्या जैसे थे

10:13 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
कणकुंबी भागातील वीज समस्या जैसे थे
Advertisement

हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी 

गेल्या दीड ते दोन महिन्यापासून कणकुंबी व परिसरातील गावांमध्ये अनियमित वीजपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पंधरा-वीस दिवसांपूर्वी हेस्कॉम अधिकारी व लोकप्रतिनिधीनी दिलेले आश्वासन पोकळ ठरले आहे. वीजपुरवठ्याच्या बाबतीत हेस्कॉमचे अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले असून, यापुढे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कोणती उपाययोजना करावी, असा विचार या भागातील नागरिक करत आहेत.यापूर्वी अशा पद्धतीने कधीही अनियमित वीजपुरवठा होत नव्हता. केवळ पावसाळ्dयात एखाद्या ठिकाणी जंगलमय भागात खांबावर किंवा तारेवर एखादं झाड कोसळले किंवा तार तुटून पडली तरच एक-दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित होत होता. परंतु यावर्षी गेले दीड ते दोन महिने कणकुंबी परिसरातील जवळपास वीस गावांना अनियमित वीजपुरवठा होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वीज नसल्याने नळ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. वीजेअभावी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दळप, कांडप, दूरध्वनी यंत्रणा याबरोबरच विजेवर चालणारी इतर उपकरणे कोलमडल्यामुळे गैरसोय होत आहे.

Advertisement

पंधरा-वीस दिवसांपूर्वी कणकुंबी भागातील दीडशे ते दोनशे महिलांनी खानापूर हेस्कॉम कार्यालयावर घागरी मोर्चाही काढला होता. परंतु केवळ पोकळ आश्वासनापलीकडे काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे कणकुंबी आणि परिसरातील जनता आता पूर्णपणे वैतागलेली असून हेस्कॉम कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. कणकुंबी भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडत असून पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दरवर्षी पावसाळ्यात एक-दोन दिवस मुसळधार पावसामुळे किंवा वादळी व्रायामुळे खांब किंवा विद्युत तारेवर झाड कोसळले तर एक दोन दिवस विद्युतपुरवठा खंडित होत होता. परंतु यावर्षी अद्याप तसा पाऊस झालेला नाही व वादळही नाही. तरी देखील गेल्या दीड ते दोन महिन्यापासून अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी वेळीच लक्ष घालून विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा खानापूर हेस्कॉम कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आला आहे.

Advertisement
Tags :

.