वीज दरवाढीचा लवकरच ‘शॉक’
1 एप्रिलपासून प्रति युनिट 12-15 पैसे वाढ शक्य : वीज पुरवठा कंपन्यांचा केईआरसीकडे प्रस्ताव
प्रतिनिधी/ बेंगळूर
नव्या आर्थिक वर्षात राज्यातील वीज ग्राहकांच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) 1 एप्रिलपासून प्रति युनिट 12 ते 15 पैसे वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडणाला आहे. 2025-26, 2026-27 आणि 2027-28 या आर्थिक वर्षांसाठी अलिकडेच वीजदर निश्चित करण्यात आला होता. मात्र, वाढत्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केईआरसीकडून अतिरिक्त दरवाढीचा विचार सुरू आहे.
जनतेची मते गोळा केल्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून नवे वीज दर जाहीर होण्याची शक्यता आहे. एखाद्या वेळेस वीजदरवाढ झाली तर ग्राहकांच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे. राज्यातील पाचही वीज पुरवठा निगमनी (एस्कॉम) केईआरसीला सादर केलेल्या प्रस्तावानुसार 1 एप्रिलपासून प्रति युनिट 12 ते 15 पैसे वीज दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पाचही वीज पुरवठा कंपन्यांनी 2026-27 या वर्षात सरासरी 64 पैसे प्रति युनिट दरवाढ करण्याचा प्रस्ताव केईआरसीकडे सादर केला होता. मात्र काही श्रेणींमध्ये ही दरवाढ 67 ते 99 पैशांपर्यंत वाढ होऊ शकते असे संकेत आहेत.
घरगुती वीज दरात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या वीज दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. काही श्रेणींमध्ये ती जास्त असू शकते. फिक्स्ड चार्जमध्येही 10 ते 20 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वीज पुरवठा कंपन्यांना महसुली तूट सहन करावी लागत आहे. राज्यातील सर्व एस्कॉम अंदाजे 4,500 कोटी रुपयांनी तोट्यात आहेत. यापैकी 2024-25 या वर्षात फक्त बेंगळूर वीज पुरवठा कंपनीला (बेस्कॉम) 2,800 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे वीज पुरवठा कंपन्यांनी दरवाढ करण्यास परवानगी देण्याची मागणी केईआरसीकडे केली आहे.
वीज पुरवठा कंपन्यांच्या महसूलातील तूट भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली आहे. मार्च 2025 मध्ये कर्नाटक वीज नियामक आयोगाने प्रति युनिट 36 पैसे वीज दरवाढ केली होती. आता औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज दरात वाढ करून 4,620 कोटी रुपयांची महसुली तूट भरून काढण्याची विनंती केल्याचे समजते.
गेल्या वर्षी मार्चमध्ये वीज दरवाढ झाली तेव्हा केईआरसीने खर्च वाढला असला तरी महसुलात तूट झाली आहे. दोन्हींमध्ये समतोल राखण्यासाठी वीज दरवाढ आवश्यक असल्याचे एस्कॉमनी केईआरसीला सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
बेंगळूर वीज पुरवठा कंपनीसह राज्यातील विविध एस्कॉमनी त्यांचे 2024-25 सालातील कामगिरीचा अहवाल आणि वीज दरवाढीचा प्रस्ताव केईआरसीकडे सादर केला आहे. अहवाल सादर केल्यानंतर आयोगाने जनतेच्या हरकती मागविण्याचा निर्णय घेतला आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील विविध भागात केईआरसी जनतेच्या सभा घेणार आहे. या सभांमध्ये ग्राहक आपली मते मांडू शकतात.
वीज दरवाढीची प्रस्तावित मागणी
बेस्कॉम 98 पैसे
हेस्कॉम 96 पैसे
मेस्कॉम 91 पैसे
जेस्कॉम 99 पैसे
चेस्कॉम 97 पैसे