Dushere news | कृष्णाकाठ होरपळला! ऐन उन्हाळ्यात शिवनगर फीडरवरून ५ ते ७ तास वीज गायब; महावितरणविरुद्ध तीव्र संताप
शिवनगर फीडरवरील वीजपुरवठा विस्कळीत;
दुशेरे : जिल्ह्यात सध्या उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत आहे. दिवसभर भाजून काढणाऱ्या कडक उन्हाचा तडाका आणि रात्रीही कमी न होणारा उकाडा त्यामुळे आधीच नागरिक हैराण आहेत. त्यात कृष्णाकाठावरील शिवनगर फीडरवरून दररोज दुरूस्तीच्या कामासाठी सकाळपासून पाच ते सात तास वीज गायब होत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
कराड तालुक्यातील कृष्णा काठावरील शिवनगर फीडरवरील रेठरे बुद्रुक, खुबी, शिवनगर, गोंदी, जुळेवाडी, शेणोली, शेरे, दुशेरे यागावांतील वीजपुरवठा ऐन उन्हाळ्यात दुरुस्तीच्या नावाखाली पाच ते सात तासांहून अधिक वेळ खंडित केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. सतत वीज गायब होत असल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. दिवसभरात कोणत्याही वेळी अचानक वीज गायब होत असल्याने घरगुती कामापासून व्यापारी व्यवहारापर्यंतसर्वच कामावर परिणाम होत आहे.
सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. दिवस असो किंवा रात्र, उकाड्यामुळे नागरिकांना झोप लागत नाही. त्यातच वारंवार वीज खंडित होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक घरांमध्ये पंखे, कुलर, पाण्याच्या मोटर बंद राहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. किराणा दुकाने, थंड पेय विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते तसेच लहान उद्योगधंदे यांचे आर्थिक नुकसान होत आहे. वीज वारंवार ये-जा करत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याची भीतीनागरिक व्यक्त करत आहेत.
अनेक वेळा कमी-जास्त दाबाने यापूर्वी वीजपुरवठा झालेला होता. त्यावेळी टीव्ही, फ्रीज, संगणक, मोटारी यांचे नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती नको, अशी भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, शेतीपंपासाठी आवश्यक वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता त्यामुळे शेतकरी संकटात असताना विजेच्या अस्थिर पुरवठ्याने त्याची चिंता आणखी वाढली आहे. किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.