ऐन दिवाळीत आचरा पंचक्रोशीत विजेचा लपंडाव
नागरिकांचा संताप वाढला
आचरा प्रतिनिधी
आचरा गावात गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कालपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. लाईट गेल्यावर 2 ते 3 तास लाईट गायब होत आहे. ऐन दिवाळीत विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे व्यापारी ,ग्राहक,गृहिणींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घरगुती कामे, ऑनलाईन शिक्षण, तसेच व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे.काल संध्याकाळच्या वेळेस विजेचा पुरवठा खंडित झाल्याने गावच्या गाव अंधारात बुडला होता. भाऊबीजसाठी ग्रामस्थ बाहेर पडलेले असताना रस्ते अंधारमय असल्यामुळे वाहतूक आणि पादचारी यांचीही गैरसोय होत आहे. वारंवार होणाऱ्या या वीजबंदीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, दर तासाला वीज जाते. मोबाईल चार्ज होणं, पाणी पंप सुरू ठेवणं अशक्य झालं आहे. व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांचे आईस्क्रीम वितळले आहेत, हॉटेल व्यवसायिकांचे भाज्या वगैरे खराब झाले आहेत, इलेक्ट्रॉनिक व्यापाऱ्यांवर परिणाम झाला आहे. ऑनलाइन काम करणाऱ्यांची कामं रखडली आहेत. वारंवार विजेचं येणं-जाणं सहन होत नसल्याने ग्रामस्थ व्यापारी संताप व्यक्त करत आहेत