कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीज ग्राहक संघटनेचे स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

02:25 PM Aug 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, महावितरणच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली आहे. यापूर्वी वेळोवेळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटी घेऊन आणि लाक्षणिक उपोषण करूनही प्रशासनाने आणि महावितरणने ग्राहकांच्या समस्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आता अखेर वीज ग्राहक संघटनेने १५ ऑगस्ट २०२५ रोजी, स्वातंत्र्यदिनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो वीज ग्राहकांच्या पाठिंब्यावर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच उपोषणाची वेळ आली असून, याला पूर्णपणे जिल्हा प्रशासन आणि महावितरण जबाबदार असेल, असा गंभीर इशाराही संघटनेने दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना ही गेल्या तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५९ हजार २२३ वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून वारंवार निवेदने देऊनही आणि २६ जानेवारी २०२४ रोजी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करूनही वीज ग्राहकांच्या समस्यांमध्ये इंचभरही फरक पडलेला नाही. जिल्ह्यातील वीज वितरण प्रणालीची दुर्दशा आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उदासीन दृष्टिकोन यामुळे ग्राहकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्या चुकीच्या कारभारामुळे वीज ग्राहकांना प्रचंड त्रास होत आहे. वीज पुरवठ्यातील अनियमितता, वारंवार होणारे बिघाड, वाढीव वीज बिले, स्मार्ट मीटर बसवण्यासारख्या विवादास्पद निर्णयामुळे ग्राहक त्रस्त आहेत. यापूर्वी हजारो ग्राहकांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवल्या असूनही, महावितरण कोणत्याही ग्राहकाचे समाधान करू शकलेले नाही. संघटनेने यापूर्वी सीएमडी महावितरण मुंबई, मुख्य अभियंता रत्नागिरी तसेच केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपादजी नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही वीज ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.२७ ऑगस्ट २०२५ रोजी कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. या सणासुदीच्या काळात अखंड वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. मात्र, महावितरण सिंधुदुर्गने पावसाळ्याआधी वीज वाहिनी आणि विद्युत प्रणालीची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेवर केलेली नाहीत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधील सुमारे साडेआठ लाख नागरिकांना वारंवार अंधारात राहावे लागत आहे. १९ मे २०२५ रोजी आलेल्या अवकाळी पावसानंतर सिंधुदुर्गातील जनता अक्षरशः आठ ते दहा दिवस सातत्याने काळोखात होती. याला संपूर्ण जबाबदार महावितरण सिंधुदुर्ग आहे. या अनुभवामुळे गणेशोत्सवात वीज पुरवठ्याची काय स्थिती असेल, याची चिंता ग्राहकांना सतावत आहे. वीज ग्राहक संघटनेने प्रशासनाला एक निवेदन दिले होते. त्यात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने वितरण संचालक, मुख्य अभियंता रत्नागिरी आणि जिल्हा संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक आयोजित करून वीज ग्राहकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली होती. ही बैठक सात दिवसांच्या आत आयोजित करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या संदर्भात कुठलीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळेच वीज ग्राहक संघटना संतप्त झाली आहे.याच पार्श्वभूमीवर, रविवारी सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पत्रकार परिषदेत १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, समीर शिंदे, बाळासाहेब बोर्डेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर, मनोज घाटकर, म्हापसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपोषणाचे नियोजन करण्यात आले आणि सर्व वीज ग्राहक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.या आंदोलनात केवळ वीज पुरवठ्याच्या समस्याच नव्हे, तर स्मार्ट मीटरचा मुद्दाही केंद्रस्थानी आहे. जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी सांगितले की, स्मार्ट मीटरच्या विरोधात संघटनेचा लढा सुरूच राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ४०,००० स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यात १५,००० तर कणकवली विभागात २५,००० स्मार्ट मीटरचा समावेश आहे. सावंतवाडी शहरातच एक हजार स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.स्मार्ट मीटरमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबाबत पटेकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी ग्राहकांना आवाहन केले की, त्यांनी आताच सावध व्हावे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणादरम्यान, ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या संदर्भात समस्या आहेत, त्यांनी लेखी स्वरूपात आपल्या तक्रारी मांडाव्यात. स्मार्ट मीटरमुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान, डेटा सुरक्षिततेचा प्रश्न आणि तांत्रिक समस्यांवर संघटनेने यापूर्वीच आवाज उठवला आहे. जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, वीज ग्राहकांच्या या गंभीर समस्यांच्या संदर्भात ते लवकरच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. फडणवीस यांच्याकडे ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी असल्याने त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठ्याची संपूर्ण माहिती सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जाईल. जर उपोषणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, याला महावितरण आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही संघटनेने दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # Electricity Consumers Association# sindhudurg # hunger strike #
Next Article