आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत 17 टक्के वाढ
1.96 दशलक्ष वाहनांची विक्री : दुचाकीचा वाटा अधिक
मुंबई : खूप साऱ्या अडचणींना सामोरे जात वाटचाल करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नोंदणीत चांगली कामगिरी केली आहे. सदरच्या आर्थिक वर्षात 1.96 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
उद्दिष्ट हुकले
मागच्या आर्थिक वर्षात 1.68 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांची एकंदर नोंदणी झाली होती. दुचाकी, तिचाकी आणि प्रवासी वाहनांचा या वाढीमध्ये वाटा चांगला राहिला आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. 2 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहन विक्रीचे उद्दिष्ट होते. मात्र हे उद्दिष्ट थोडक्यात हुकले आहे.
11 लाख दुचाकींची नोंदणी
सर्व प्रकारातील वाहन विक्रीवर नजर टाकल्यास 1.14 दशलक्ष दुचाकी नेंदणी झाल्या आहेत, मागच्या आर्थिक वर्षात 9,48,561 इतकी वाहनांची संख्या होती. तर 6,99,062 तिचाकींची नोंदणी झाली असून वर्षाच्या आधारावर पाहता यात 10 टक्के वाढ दिसली आहे. प्रवासी वाहनांच्या नोंदणीचा विचार केल्यास ज्यात इलेक्ट्रिक कार्स आणि एसयुव्ही वाहनांचा समावेश आहे. 1,06,000 इतक्या प्रवासी वाहनांची नोंदणी आर्थिक वर्षात केली गेली आहे. मागच्या आर्थिक वर्षात 91,000 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. या प्रकारातील वाहनांची नोंदणी वाढण्यामागे नव्या ब्रँडस्चा प्रवेश आणि सद्यस्थितीतील कंपन्यांचा विस्तार ही कारणे सांगितली जात आहेत.
पहिल्या तिमाहीत फेमची सबसिडी बंद झाल्याने दुचाकी विक्रीत काहीसा परिणाम दिसून आला होता. पण नंतर काही कालावधीनंतर दुचाकींच्या विक्रीत सुधारणा दिसून आल्या आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पाहता एकंदर सर्व प्रकारच्या वाहन नेंदणीत दुचाकींची नोंदणी 58 टक्के इतकी दिसून आली आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि कंपन्यांचा विस्तार या कारणास्तव दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ दिसते आहे.
कोणाचा आहे दबदबा
इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये पाहता हिस्सेदारीत ओलाचा दबदबा कायम राहिला आहे. भारतीय बाजारातील 30 टक्के वाटा एकट्या ओला इलेक्ट्रिकने घेतला आहे. यानंतर 12 टक्के वाटा उचलत टीव्हीएस ही दुसऱ्या नंबरवर राहिली. यापाठोपाठ बजाज ऑटोने चेतकच्या साथीने 11.7 टक्के वाटा उचलला आहे. हिरो मोटाकॉर्पचे पाठबळ असलेल्या अॅथर एनर्जीने बाजारात 6.6 टक्के इतका वाटा उचलला आहे. मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात ओलाने 3,44,005 वाहनांची विक्री केली आहे. याच्या मागच्या वर्षी विक्री 3,29,947 इतकी होती.