वृद्ध-रुग्णांसाठी रेल्वेस्थानकावर इलेक्ट्रिक वाहनाची सुविधा
रेल्वे डब्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांची सोय
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये वयोवृद्धांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशांना पार्किंगपासून प्लॅटफॉर्मपर्यंत ये-जा करण्यासाठी इलेक्ट्रिक गाडीची मागणी करण्यात येत होती. याची दखल घेत मोठ्या महानगरातील रेल्वेस्थानकांप्रमाणेच आता बेळगाव रेल्वेस्थानकावरही बॅटरीच्या गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वयोवृद्ध व रुग्णांना ये-जा करणे शक्य होत नाही. अशा प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर बॅटरीवरील इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबई, पुणे, बेंगळूर, हुबळी अशा मोठ्या रेल्वेस्थानकांवर इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेळगावमधून दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असल्यामुळे या गाड्यांची आवश्यकता भासत होती. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नैर्त्रुत्य रेल्वेकडे अशी वेळोवेळी मागणीही केली होती. प्रवाशांच्या मागणीची दखल घेत दोन दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक गाडी बेळगाव रेल्वेस्थानकावर दाखल झाली आहे. या गाडीचा लवकरच शुभारंभ नैर्त्रुत्य रेल्वेकडून केला जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. बेळगाव रेल्वेस्थानकात अनेक हायटेक सुविधा दिल्या जात असताना आता या सुविधेचीही भर पडली आहे.