For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजेचा शॉक गजराजांनाही

11:07 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजेचा शॉक गजराजांनाही
Advertisement

वर्षभरात 69 हत्तींचा दुर्दैवी मृत्यू : वीज, वनखाते मात्र अनभिज्ञ

Advertisement

बेळगाव : धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेला गजराज अर्थात हत्तींचे विजेचा शॉक बसून मृत्यू होण्याचे प्रमाण काहीअंशी वाढत असून, यावर वनखाते व वीजपुरवठा मंडळाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. राज्यात यावर्षी 10 नोव्हेंबरपर्यंत 69 हत्ती मृत्युमुखी पडले असून, यापैकी 12 हत्ती विजेचा शॉक बसून तर उर्वरित हत्ती गोळीबारात मृत्युमुखी पडल्याचे तपासांती समजून आले आहे. गणपतीचे रूप म्हणून गजराजाची भारतीय संस्कृतीत पूजा-अर्चा होत असली तरी वनात राहणारे हत्ती हे टस्कर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हिंस्त्र कारवाया शेतकरी व समाजालाही घातक ठरत आहेत.

शेतवडी, उसाचे मळे यासारख्या ठिकाणी धुमाकूळ घालणारे टस्कर पिकांची हानी तर करतातच, प्रसंगी लहान प्राणी, शेतकऱ्यांचाही जीव घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. वनांचा नाश व त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ लोकवस्तीत येणारे वन्यप्राणी, त्यांच्या त्रासाने शेतकरी किंबहुना समाजही वैतागून जाणे ही बाब नवी नाही. टस्करांचा जेव्हा शेतवडीत किंवा लोकवस्तीत धुमाकूळ सुरू होतो, तेव्हा वनखाते टस्करांवर कारवाईसाठी उपक्रम हाती घेते. गोळीबार केल्यास टस्कर मृत्युमुखी पडतात. पण, एका अर्थाने वन्यप्राण्याची ही शिकारच ठरते. त्यामुळे वनखात्यालाही हिंस्त्र प्राण्यांवर कठोर कारवाई करताना अनेकदा विचार करावा लागतो.

Advertisement

राज्यात वर्षभरात सरासरी 12 हत्तींचा वीज धक्क्याने मृत्यू

राज्यात वर्षभरात सरासरी 12 हत्ती विजेच्या धक्क्याने व शिकाऱ्यांच्या गोळीबारातही मृत्युमुखी पडले आहेत. यावर्षी 22 मार्च रोजी यल्लापूर (कारवार वनक्षेत्र), 12 मे चिक्कमंगळूर, 25 व 29 मे मडिकेरी, 22 जून विराजपेठे (जि. कोडगू), 27 ऑक्टोबर चिक्कमंगळूर, 5 नोव्हेंबर शट्टीहळ्ळी (ता. शिमोगा) व हासन येथे हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. शिमोगा व चिक्कमंगळूर जिल्ह्यांमध्ये 2008 ते 2024 या 16 वर्षांत 26 हत्तींचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्ती दगावले असले तरी हत्तींना वाचविण्यासाठी वनखात्याकडून अथवा वीज मंडळाकडून ठोस उपाययोजना हाती घेतल्या जात नाहीत.

उपाययोजना करण्यात वनखाते अपयशी

विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडणाऱ्या हत्तींची नोंद घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात वनखाते अपयशी ठरले आहे. त्यामुळे हत्तींची शिकार करणाऱ्यांना कुणाची भीती राहिली नाही. विजेच्या धक्क्याने किंवा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर खटला दाखल करण्याचे अधिकार पोलीस खात्याला आहेत. त्याचबरोबर अवैधपणे विद्युत वाहिन्या टाकून हत्तींच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकारही पोलीस खात्याला असले तरी खाते अनभिज्ञ आहे.

20 दिवसात पाच हत्तींचा मृत्यू

पावसाच्या प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये हत्ती बळी जाण्याचे प्रमाण अधिक आहे. याला पायबंद घालण्यासाठी वनखाते अपयशी ठरले आहे. गेल्या 20 दिवसात पाच हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. वनखात्याने या सर्व प्रकरणांचे गांभीर्य ओळखून ठोस उपाययोजना हाती घेणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.