For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीच्या मायाजालात मतदार राजा

06:01 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीच्या मायाजालात मतदार राजा
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन फेऱ्या झाल्यावर एक अजबच चित्र दिसू लागले आहे. सत्ताधारी भाजपचे धाबे दणाणलेले आहे. एक अदृश्य भीती राज्यकर्त्यांना सतावत आहे. 400 पारच्या बाता मारणे एकदम थांबल्यासारखे झाले आहे. यंदा गाडी 300 पार तरी जाणार काय याची चिंता भेडसावू लागली आहे. अशा वेळी 200 पार झाले तरी पुरे अशी मल्लिनाथी ऐकू येऊ लागली आहे. हे चित्र कितपत बरोबर अथवा चूक ते जून 4ला निकाल आल्यावर कळेल. पण जून चार म्हणजे फार दूर वाटू लागले आहे.

Advertisement

निवडणुकीच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे अल्पसंख्यांक समाजावर आगपाखड सुरु करून हिंदुत्वाची मतपेढी घट्ट करण्याचा चालवलेला प्रयत्न हा भाजपच्याच अंगलट येणार अशी भाकिते सुरु झाली आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीलाच ब्रह्मास्त्र वापरावे लागणे म्हणजे भाजपाला पराभवाची भीती जाणवू लागली आहे असा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जात आहे. 2024 मध्ये भाजपला 2004च्या पुनरावृत्तीच्या धास्तीने वेडेपिसे केले आहे काय? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता अचानक गेली होती. मोदी यांनी ही आगपाखड राजस्थानमध्ये प्रथम केली असल्याने भाजप तिथे आव्हानात्मक परिस्थितीत आहे असे मानले जात आहे.

2024 हे 2004 होणार अथवा नाही ते येणारा काळ दाखवेल पण आज जे दिसते आहे ते विचित्र आहे. 2014 आणि 2019 प्रमाणे या निवडणुकीत भाजपचे नॅरेटिव्ह चालत नसून काँग्रेसचे चालत आहे आणि पंतप्रधान आणि इतर सत्ताधारी नेते हे त्यावर वक्तव्य करून एकप्रकारे आपली असहाय्यता दाखवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले संविधान बदलण्याचा कट मोदी आणि त्यांचे सहकारी करत आहेत या विरोधकांच्या प्रचाराचा प्रभाव पार खोल गेलेला आहे. भाजप वाजवत असलेले ‘विकसित भारताचे’ ढोल फारसा प्रभाव पाडताना दिसत नाहीत.

Advertisement

उत्तर प्रदेशमधील एका पत्रकाराने आंबेडकर जयंती दिवशी काही जिह्यांचा अचानक दौरा केला तेव्हा त्याला 5-6 जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी राम नवमी पेक्षा मोठ्या मिरवणूका काढलेल्या दिसल्या. कोणत्याही पक्षाने पुढे होऊन हे आयोजन केले नव्हते पण त्याला जबर प्रतिसाद मिळालेला होता. महामानव डॉक्टर आंबेडकर हा पददलित वर्गाचा एक भावनिक मुद्दा आहे आणि त्यांच्या कामाला नख लावण्याचे काम चालले आहे हा समज प्रस्थापितांकरता धोकादायक आहे. 2004च्या निवडणुकीच्या वेळी देखील ‘संविधान संकटात’ हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला होता. त्याकाळी वाजपेयी सरकारने न्यायमूर्ती एम. एन. वेंकटचल्लया यांच्या अध्यक्षतेखाली एक

कॉन्स्टिट्यूशन रिव्यू कमिटी स्थापन केली होती. त्याने गहजब माजला होता.

जवळजवळ दोन महिने चालणाऱ्या लोकशाहीच्या या महायज्ञात वारा कोणत्या बाजूला आणि कसा वाहत आहे हे सांगणे अवघड असले तरी भाजपविरुद्ध थोडी हवा दिसू लागली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. उत्तर प्रदेशात भाजपचा वरचष्मा असला तरी तिथे स्थानिक पातळीवर इतके विविध मुद्दे पुढे येत आहेत त्याने विरोधकांना अचानक बळ मिळत आहे असे सांगितले जात आहे. एक उदाहरणच द्यायचे झाले तर महाराष्ट्राचे माजी मंत्री कृपा शंकर सिंग यांना भाजपने जौनपूरमधून उतरवले आहे ते स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा मुलगा नीरज हा बलियामध्ये भाजपचा उमेदवार आहे. त्याला कठीण परिस्थितीला समोर जावे लागत आहे. पंतप्रधानांची वाराणसी सोडली तर त्याभोवतालच्या सर्व मतदारसंघात भाजपला कडव्या मुकाबल्याला सामोरे जावे लागत आहे. आजघडीला भाजप आणि मित्रपक्षांना 80 पैकी जास्तीतजास्त 55 जागा मिळू शकतात असे दावे जर खरे ठरले तर त्या राज्यातच सत्ताधारी पक्षाला दहा जागांचे नुकसान संभवते.

हरयाणाचे मनोहरलाल खट्टर यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अचानक का गेली याचा एक मनोरंजक किस्सा राजधानीच्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. खट्टर हे प्रवास करत असताना अचानक त्यांना म्हणे पंतप्रधानांनी फोन केला. गाडीतून उतरून त्यांनी तो घेतला. तुमच्या राज्यात किती जागा येतील असा मोदींचा प्रश्न होता. राज्यातील दहाच्या दहा जागा असे उत्तर खट्टर यांनी दिले. दुसऱ्या दिवशी त्यांना पायउतार केले गेले. ज्या पंतप्रधानांना सगळ्या जगाची खबर असते त्याला खट्टर मामा बनवू लागले म्हणून ते घरी गेले अथवा ते अकार्यक्षम असल्याचा अंदाज श्रेष्ठींना आला.

अशा या वातावरणात विरोधक ‘नॉर्थ मे हाफ, साऊथ मे साफ’ असे सांगत  भाजपची फिरकी घेत आहेत. एकेकाळी भाजपचे अध्यक्ष राहिलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे प्रचारात पंतप्रधानांची ज्या प्रकारे भलावण करत आहेत तो राजकीय वर्तुळात एक थट्टेचा विषय झालेला आहे. युक्रेन रशिया युद्ध मोदींनी साडेचार तास थांबवले होते असा दावा राजनाथनी केला होता. गम्मत अशी की अशा या बदलत्या वातावरणात ‘400 पार’ ही भाजप के ‘गले की ह•ाr’ बनली आहे. भाजपला संविधान बदलण्यासाठीच पाशवी बहुमत पाहिजे ही विरोधकांची गोळी लागू पडत आहे.

पुढील पाच फेऱ्यांमध्ये मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे कोणत्या प्रकारची डागडुजी करणार त्यावर निकाल अवलंबून राहणार आहे. मोदी-शहा हे 24 तास राजकारण करणारे असल्याने आणि प्रत्येक निवडणूक जोरदारपणे जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरत असल्याने पुढील दीड महिना हा राजकीय थराराचा राहणार आहे. निवडणुकीच्या सात फेऱ्या ठेवल्याबद्दल भाजपाई निवडणूक आयोगाविरुद्ध कुजबुज करताना दिसत आहेत. या आयोगाचे सदस्य खास मोदी यांनीच निवडले आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानेच वेळापत्रक ठरले आहे हे राजकीय वर्तुळात उघड गुपित आहे. सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो’ अशी या आयोगाची भूमिका आहे असा विरोधकांचा वेळोवेळी आरोप राहिलेला आहे. भाजपचे स्पिन डॉक्टर नेत्यांनी भाषणात काय बोलले याबाबत लक्ष घालण्याचे आयोगाचे अजिबात काम नाही असा अजब सिद्धांत मांडत आहेत. विदेशी प्रसारमाध्यमे देखील जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत फारसे चांगले चाललेले नाही अशी टीका करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त भाषणानंतर 17,000 नागरिकांनी आयोगाला पत्र लिहून तक्रार केलेली आहे. हा एक प्रकारचा विक्रम देखील असू शकतो. मोदींच्या या वक्तव्यांनंतर जी स्मशान शांतता पसरली आहे ती जास्त जीवघेणी आहे. बहुसंख्याक समाज असो अथवा अल्प संख्यांक असोत. सगळ्यांनी एक गंभीर शांतता पाळली आहे त्याने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. भाजपकडे प्रचाराच्या अभूतपूर्व रणधुमाळीकरता काहीच कमी नाही. निवडणूक रोख्यांद्वारा त्या पक्षाला 8,000 कोटी रुपयांच्या जवळपास मिळाले आहेत. बाकी सर्व लहानथोर पक्षांना एकूण एव्हढेच व त्यापेक्षा कमी मिळाले आहेत. पंतप्रधानांचा झंझावाती प्रचार बाजूला ठेवला तरी भाजपच्या इतर नेत्यांकरता हेलिकॉप्टरची सर्वात जास्त बुकिंग झालेली आहेत. गुगल आणि फेसबुकवर काँग्रेसच्या एका जाहिरातीच्या जबाबात भाजपच्या 4 जाहिराती आहेत. एव्हढा सारा खर्च अशासाठी की भाजप आणि मित्रपक्षांना 400 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत या प्रचाराला लोकांच्या पचनी पाडण्यासाठी हे सारे घडत आहे. भाजप 200 पार करू शकत नाही आणि तिची गाडी 150-160 मध्येच अडखळेल असा दावा राहुल गांधींनी केला आहे तर मुख्य विरोधी पक्षाचा औपचारिक दर्जा हुकलेली काँग्रेस यंदा शंभरी गाठणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. अलीकडील काळातील ही एक रोमहर्षक निवडणूक बनत आहे हे मात्र खरे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.