कॅनडात 28 एप्रिलला होणार निवडणूक
ट्रम्प यांच्या आयातशुल्काच्या धमकीची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी देशात 28 एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कॅनडावर आयातशुलक लादण्याची धमकी देण्यात येत असताना कार्नी यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून उदभवलेल्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी आम्हाला एक मजबूत जनादेशाची आवश्यकता असल्याचे कार्नी यांनी म्हटले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या या वक्तव्यातून अमेरिका आणि कॅनडातील संबंध अत्यंत बिघडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही देश काही काळापूर्वी जुने सहकारी आणि प्रमुख व्यापारी भागीदार होते. ट्रम्प यांनी अलिकडेच कॅनडाला अमेरिकेचा 51 वा प्रांत करण्याची धमकी दिली होती. ट्रम्प यांच्या याच धमकीनंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची चुकीची कारवाई आणि आमच्या सार्वभौमत्वाबद्दल त्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे आम्हाला आमच्या जीवनाच्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गव्हर्नर जनरलना संसद विसर्जित करणे आणि 28 एप्रिल रोजी निवडणूक करविण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी यावर सहमती दर्शविली असल्याचे कार्नी यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
14 मार्च रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर कार्नी यांनी ट्रम्प यांच्यासोबत काम करु शकतो आणि त्यांचा आदर करत असल्याचे म्हटले होते. परंतु आता त्यांनी ट्रम्प प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅनडात 20 ऑक्टोबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार होती. परंतु यापूर्वीच नव्या पंतप्रधानांनी मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली आहे. कॅनडाचे नवे पंतप्रधान स्वत:ला लिबरल पार्टीचा नेता म्हणून निवडले जावे याकरता सद्यकाळातील समर्थनाचा लाभ घेऊ पाहत असल्याचे मानले जात आहे.
मार्क कार्नी यांच्याकडून मध्यावधी निवडणुकीची घोषणा झाल्याने आता यासंबंधीच्या कयासांना पूर्णविराम मिळाला आहे. कॅनडातील नवे सरकार अमेरिकेकडून लादण्यात येणाऱ्या आयातशुल्काला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा अनुमान व्यक्त केला जात आहे. याचबरोबर नवे सरकार अनेक देशांसोबतच्या स्वत:च्या संबंधांची समीक्षा देखील करणार आहे.