For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुका रंगू लागल्या, सत्ताधारी-विरोधक जोमात

06:27 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुका रंगू लागल्या  सत्ताधारी विरोधक जोमात
Advertisement

सध्याची लोकसभा निवडणूक कसे रूप पालटत आहे? कोणाचे घोडे किती पुढे आहे? कोणाचे किती मागे? कोण अगोदरच बाद झाला आहे? याविषयी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. अशातच निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी दोन फेऱ्या होऊन गेल्यावर भरपूर वाढवल्याने एका वेगळ्याच संशयाला बळ दिले आहे. असे पूर्वी कधीही घडले नसल्याने ‘दाल में कुछ काला है’ असे विरोधकांना वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्याचा सपाटा लावला आहे तर राहुल गांधींनी राय बरेलीतून उमेदवारी घेऊन उत्तर प्रदेशातील चुरस वाढवली आहे आणि ‘हम भी कुछ कम नही’ असा संदेश विरोधकांनी दिलेला आहे.  

Advertisement

यंदाच्या निवडणुकीत कोणाचीच हवा नाही. मित्र पक्ष/ घटक पक्ष कसा किल्ला लढवणार/ एकमेकांना लढण्याला मदत करणार त्यावर प्रतिस्पर्धी आघाड्यांचे  भवितव्य अवलंबून आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने बंगालमध्ये एकही जागा मित्र पक्षांकरता सोडलेली नाही तरीही तृणमूल आपल्या आघाडीतील एक अग्रगण्य सदस्य आहे असे काँग्रेस आग्रहाने सांगत आहे. विरोधकांची आघाडी विस्कळीत आहे ही तिची एक प्रकारे शक्तीच आहे असे काही जाणकार मानतात. निवडणूक निम्मी सरत असताना ‘एक मोदी सब पे भारी’ ही भाजपची शेखी देखील कमी होत आहे.

Advertisement

अशावेळेला सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांची संख्या विरोधकांपेक्षा वाढवून आपण किती सरस आहोत हे दाखवण्याचा दांडगा हव्यास भाजपच्या अंगलट येत आहे की काय असा प्रश्न ऐकू येत आहे. भाजपचे काही मित्र पक्ष म्हणजे निव्वळ खोगीर भरती आहे. काही जण भाजपने साथ सोडताच वाऱ्यावर उडून गेल्यासारखे होत आहेत तर काही धोरणी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भीतीने सत्ताधारी आघाडीत सामील झालेले आहेत. जर निवडणुकीत भाजपचे बरेवाईट झाले तर पाखराप्रमाणे फुर्रकन उडून जायला ते कमी करणार नाहीत. अशावेळी ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’,असे भाजपला म्हणावे लागेल.

प्रज्ज्वल रेवण्णाचे ‘महाप्रताप’ भाजपला केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशभर अडचणीत आणत आहेत. नव्वदीच्या माजी पंतप्रधान देवेगौडा यांना या वयात यातना सहन करायला लागत आहेत. निधर्मी जनता दलाबरोबर केलेला समझोता भाजपकरता ‘गले की ह•ाr’ बनला आहे. प्रज्ज्वलचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट ताबडतोब रद्द करून त्याला मायदेशी आणले जावे ही काँग्रेसची मागणी आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. भाजपधार्जिण्या मीडियाला देखील प्रज्ज्वल

प्रकरणाची दखल घ्यावी लागत आहे.

निधर्मी जनता दलाला अगोदरच घरघर लागली आहे त्यात प्रज्ज्वल प्रकरणाने पेट घेतल्याने तो स्वाहा होणार की कसे ते येत्या निवडणुकीत दिसणार आहे. असंगाशी संग ठेवल्याचा परिणाम भाजपला भोगायला लागणार आहे. कर्नाटकमध्ये अजून अर्धी निवडणूक आहे आणि देशभर विरोधकांना एक मुद्दा मिळालेला आहे. प्रज्ज्वल प्रकरणाचा फटका वादग्रस्त भाजप खासदार आणि कुस्तीगीर परिषेदचे सर्वेसर्वा ब्रिजभूषण शरण सिंग यांना उत्तर प्रदेशात बसला आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट दिले गेले आहे. सिंग यांना नाखुश केले तर उत्तर प्रदेशातील तीन-चार मतदार संघ प्रभावित होतील ही भाजपला भीती आहे. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील चुरशीची लढाई दिसत असताना भाजपला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यामुळे अपशकुन झाला आहे की काय अशी शंका राजकीय जाणकारांना येत आहे. प्रकृती बरी नसल्याने नितीश हे पूर्वीसारखे फर्डे वत्ते राहिलेले नाहीत आणि सभेमध्ये लांबलचक भाषणे करून आणि असंबद्ध बोलून ते गोंधळ माजवत आहेत. त्यांना बोलताना आवरणे ही आता भाजपकरता तारेवरची कसरत झालेली आहे.  नितीश यांच्या संयुक्त जनता दलाची ताकद कमी झाली असल्याने त्यांचे बरेच उमेदवार हरतील अशी भीती देखील भाजपला सतावत आहे.

उत्तरप्रदेशात बऱ्याच छोट्या छोट्या पक्षांना भाजपने बरोबर घेतले आहे. त्यांचा मान त्यांच्या मतदारसंघापुरता आहे. योगी आदित्यनाथ यांची सरकारवरील पकड इतकी घट्ट आहे की तेथील बाकी सारे नेते फुटकळ आहेत. विरोधकांच्या आघाडीचा भाग असलेला राष्ट्रीय लोक दल भाजपबरोबर आला खरा पण त्याची भाजपने फटफजितीच केली असे दिसून आले. पक्षाचे नेते आणि चरण सिंग यांचे नातू जयंत चौधरी यांची ‘न घर का, न घाट का’ अशी अवस्था झालेली आहे.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची राज्यातील आघाडी ही काही जागांवर कडवा मुकाबला देत आहे.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या शिवसेना तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर जागा अंतिम करण्यासाठी भाजपने जे गुऱ्हाळ लावले त्याने दोन्ही बाजूचा शक्तिपात झाला हे एक उघड गुपित आहे. जागावाटपाचे हे दळण दळले जात असताना विरोधकांना एकत्र यायची चांगलीच संधी मिळाली आणि त्यांच्या प्रचार मोहिमेला गती आली. केरळमध्ये डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनारायि विजयन हे भाजपचे एक अदृश्य मित्रच मानले जातात. ज्या पद्धतीने भाजप राहुल गांधींवर हल्ला चढवतो त्याप्रमाणे विजयन देखील करतात. राहुल म्हणजे अजूनही ‘अमूल बेबी’ आहेत असे त्यांना वाटते. काँग्रेसविरोधी असणाऱ्या विजयन यांना विधानसभा निवडणुकीत मोदी अप्रत्यक्षपणे मदत करतात असे बोलले जाते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे जुन्याकाळाप्रमाणे चालत आलेले तत्वज्ञान केरळमध्ये बघायला मिळत आहे.

तामिळनाडूत भाजपने नवीन पक्षांशी केलेला घरोबा त्याला दोन-तीन मतदारसंघात मदत करत आहे. अन्नामलाई या भाजपच्या तरुण तडफदार नेत्याने राज्य ढवळून काढून पक्षाला या द्राविडीय राजकारणाच्या राज्यात हुरूप आणला आहे त्याला यथावकाश फायदाच होईल. आजमितीला मात्र द्रमुक आणि तो घटक असलेली इंडिया आघाडी राज्यात पुढे आहे. कालपरवापर्यंत हरयाणामध्ये भाजपच्या सरकारात उपमुख्यमंत्री असलेले जननायक जनता पक्षाचे दुश्dयांत चौटाला हे बदलत्या राजकारणाने रस्त्यावर आले आहेत. मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाचा नारळ देत असताना भाजपने चौटाला यांना देखील वाऱ्यावर सोडले. नव्या परिस्थितीत त्यांची अवस्था धोब्याच्या गाढवासारखी झालेली आहे. शेतकरी आंदोलनाला विरोध केल्यानं पंजाब आणि हरयाणातील ग्रामीण भागात भाजप आणि मित्र पक्षांना प्रचारात अडचणी येत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना काही खेड्यात शिरून देखील दिले जात नाही आहे.

दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून भाजपने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे असे काही निष्ठावंतदेखील म्हणत आहेत. आम आदमी पक्ष ज्याप्रकारे या मुद्यावर रान उठवत आहे त्याने राजधानीतील भाजपच्या सातपैकी काही जागा धोक्यात आलेल्या आहेत. इंडिया आघाडी म्हणजे श्याम भटाची तट्टाणी असून भाजप प्रणित आघाडी म्हणजे ‘इंद्राचा ऐरावत’ आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पंतप्रधान नरेंद मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चालवला असला तरी त्याचा उपयोग होत नाही आहे.

गेल्या आठवड्यात रालोआचा भाग असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाने एकच गहजब माजवला. आंध्र प्रदेश निवडणुकीसंबंधी नायडू आणि त्यांचे अजून एक मित्रपक्ष पवन कल्याण यांच्या जनसेना यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यावर नायडू आणि पवन कल्याण यांची चित्रे होती पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खड्यासारखे वगळले होते. बदलत्या परिस्थितीचे हे चित्र आहे अथवा कसे हे येणारा काळ दाखवेल.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.