ZP Election 2025: आरक्षणच ठरविणार उमेदवारांचे राजकीय भवितव्य..
उमेदवारी देताना नेत्यांची होणार दमछाक
चंडगड: जिल्हा परिषदेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्या तरी आतापासूनच संभाव्य उमेदवारांनी आपली संपर्क मोहीम गतिमान केली आहे. अनेकजण आपले वाढदिवस साजरे करीत असून गावच्या चौका-चौकात मोठ-मोठे फलक लावत आहेत. चंदगड तालुक्यासाठी जिल्हा परिषदेच्या केवळ 4 जागा असून इच्छुकांची मात्र भाऊगर्दी आहे. राजकीय गटातटाशी होणारी युती आणि वाटणीला आलेल्या जागेवर बंडखोरी होणार नाही, याची खबरदारी घेत उमेदवार देताना नेत्यांची दमछाक होणार आहे.
मतदार संघाची फेररचना झालेली असल्यामुळे चारपैकी दोन जागा खुल्या असतील, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असला तरी आरक्षणाच्या सोडतीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. चंदगड तालुक्याची भौगोलिक रचना विचित्र आहे. तालुक्याचे एक टोक ते दुसरे टोक यातील अंतर 65 ते 70 किलोमीटरचे आहे. त्याचा विचार करून पूर्वीपासून तालुक्यात 5 मतदार संघ होते. परंतु गेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढूनही 5 ऐवजी 4 मतदार संघ केले गेले.
वास्तविक पाहता मतदार संघाची भोगोलिक रचना आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता विकासाच्या दृष्टीने किमान 6 मतदार संघ असावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आलेली होती. तथापि निवडणूक विभागाने पूर्वीप्रमाणे 5 मतदार संघही न करता गेल्या निवडणुकीप्रमाणे 4 मतदार संघ कायम केले. फक्त गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत समाविष्ठ असलेले चंदगड शहर नगरपंचायत झाल्यामुळे वगळण्यात आले आहे.
चंदगड शहरातील मतदारांची वजाबाकी झाल्याने प्रत्येक मतदार संघातील एक दोन, एक-दोन गावे कमी झाली आहेत. तालुक्यात केवळ 4 जिल्हा परिषद मतदार संघ चंदगड तालुक्यात अडकूर, माणगाव, कुदनूर आणि तुडये असे चार जिल्हा परिषद मतदार संघ तर गवसे, अडकूर, माणगाव, कोवाड, कुदनूर, तुर्केवाडी, तुडये आणि हेरे असे पंचायत समितीचे गण झाले आहेत.
केवळ चार जिल्हा परिषद मतदार संघ झाल्यामुळे प्रत्येक मतदार संघात सुमारे 45 ते 50 हजार मतदार असणार आहेत. तुडये मतदार संघात 32 ग्रामपंचायती, अडकूर मतदार संघात 30 ग्रामपंचायती, कुदनूर मतदार संघात 25 तर माणगाव मतदार संघात 23 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मतदार संघात समाविष्ठ करण्यात आलेल्या गावाबद्दल काही हरकती दाखल झालेल्या होत्या. परंतु, माणगाव मतदार संघातील हल्लारवाडी हे एकच गाव तुडये मतदार संघात घातले आहे. बाकी गावे भौगोलिक सलगतेला धरून कायम ठेवण्यात आली आहेत.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र
चंदगड तालुक्यात भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील आणि माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नंदिनी बाभुळकर, काँग्रेसचे गोपाळराव पाटील असे गट कार्यरत असले तरी ऐनवेळी राजकीय पक्ष बाजूला ठेवून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या तत्वाने युत्या घडण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. गोकुळचे ठराव देवाण- घेवाणीच्या माध्यमातूनही युतीना वेगळे टॉनिक मिळणार आहे.
परिणामी नेमके कोण कुणासोबत जाईल, हे या घडीला सांगणे कठीण असले तरी प्रस्थापित गटाविरोधात सर्वजण एकत्र येतील, अशी परिस्थिती आहे. तरीही कोणताही धोका न पत्करता संभाव्य उमेदवारांनी सर्वांशीच सलोख्याचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. सध्या तरी सगळ्यांचे डोळे आरक्षणावर खिळलेले आहेत. आरक्षणच उमेदवारांचे राजकीय आोोभवितव्य ठरविणार आहे.