तब्बल 14 वर्षांनंतर सीरियात निवडणुका
वृत्तसंस्था/ दमास्कस
बशर अल-असद यांची हुकूमशाही आणि 13 वर्षांच्या गृहयुद्धामुळे हैराण झालेल्या सीरियामध्ये जवळजवळ 14 वर्षांनंतर संसदीय निवडणुका होत आहेत. रविवारी सकाळी दमास्कसमध्ये मतदान सुरू झाल्यानंतर असद युगाच्या समाप्तीनंतर ‘नवीन युगाची सुरुवात’ म्हणून त्याचे स्वागत करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या बंडानंतर अहमद अल-शारा यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून सत्ता स्वीकारली. त्यानंतर त्यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांशी संबंध सुधारले. मे 2013 मध्ये अमेरिकेने अल-शारा यांना विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. बारा वर्षांनंतर जुलै 2025 मध्ये अमेरिकेने त्यांना दहशतवादी यादीतून काढून टाकले. गेल्यावर्षी अंतरिम अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अल-शारा यांनी आगामी निवडणूक लोकशाही बदलाच्या दिशेने पहिले पाऊल असेल असे म्हटले होते.