एप्रिल 2026 मध्ये होणार बांगलादेशमध्ये निवडणुका
मोहम्मद युनूस यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशमध्ये एप्रिल 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होतील. अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी नुकतीच यासंबंधीची घोषणा केली. भारताचा शेजारी देश असलेला बांगलादेश गेल्या एक वर्षापासून राजकीय अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे. शेख हसीना सत्तेतून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. पण काही वेळातच तेथील जनता, राजकीय पक्ष आणि लष्कराने युनूस यांच्या नेतृत्वाविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर लवकर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अखेर, जनतेच्या दबावापुढे झुकून, मोहम्मद युनूस यांनी देशवासियांना संबोधित करताना निवडणुकांची तारीख जाहीर केली.
बकरी ईदच्या आधी शुक्रवारी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर देशवासियांना संबोधित करताना युनूस यांनी ‘मी सर्व नागरिकांना कळवतो की एप्रिल 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुका होतील.’ अशी घोषणा केली आहे. युनूस सध्या बांगलादेशातील काळजीवाहू सरकारचे प्रमुख आहेत.
84 वर्षीय नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी निवडणूक प्रक्रियेत आवश्यक सुधारणांची आवश्यकता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग योग्य वेळी निवडणुकांची सविस्तर रुपरेषा शेअर करेल. सरकार देशात शांततापूर्ण आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुका यशस्वीरित्या पार पडतील. यासोबतच युनूस यांनी निवडणूक प्रक्रियेत आवश्यक सुधारणांची आवश्यकता असल्याचा पुनरुच्चार केला.
गेल्यावर्षी बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने झाली होती. यानंतर ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला सत्तेवरून हटवण्यात आले. त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला असून त्या भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. या बंडानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.