मनपा स्थायी समित्यांसाठी 12 रोजी निवडणूक
प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर : इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
. भा. प्रतिनिधी
बेळगाव
महानगरपालिकेच्या 24 व्या स्थायी समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी प्रादेशिक आयुक्तांकडून जाहीर करण्यात आला आहे. आरोग्य, बांधकाम, कर, अर्थ स्थायी समित्यांसाठी बुधवार दि. 12 रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.
सध्याच्या चारही स्थायी समित्यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे कार्यकाळ संपण्यापूर्वी स्थायी समित्यांची निवडणूक घेण्यात यावी, असा प्रस्ताव महानगरपालिकेच्या कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांना आठ दिवसांपूर्वी पाठविण्यात आला होता. समित्यांचा कार्यकाळ 11 रोजी संपणार असल्याने लागलीच दुसऱ्या दिवशी निवडणूक घेतली जाणार आहे.
यापूर्वी एकूण 65 मतदार होते. मात्र भाजपचे विधान परिषद सदस्य साबण्णा तळवार यांचा कार्यकाळ संपला असल्याने सध्या 64 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. निवडणुकीच्या प्रस्तावाबरोबरच मतदार यादी देखील कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आली होती. नवीन स्थायी समिती अध्यक्ष आणि सदस्य कोण होणार, याची उत्सुकत सर्वांना लागून राहिली आहे.
बुधवार दि. 12 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वा. पर्यंत विविध स्थायी समित्यांसाठी इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जातील. दुपारी 3 नंतर मुख्य निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला उपस्थिती, कोरम पडताळणी, अर्जांची पडताळणी, वैध अर्जांची घोषणा, उमेदवारी मागे घेणे, उमेदवारांच्या यादीची घोषणा, निवडणूक आवश्यक असल्यास मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, त्यानंतर मोजणी आणि निकालाची घोषणा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कौन्सिल विभागाकडून आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे.