निवडणुका आल्या, काँग्रेस सुस्तच!
पदाधिकारी, कार्यकर्त्यांत नाराजी
पणजी : आगामी विधानसभा निवडणुका या डिसेंबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देखील काँग्रेस पक्षात निवडणुकीच्या तयारीचे कोणतेही काम सुरू झाले नसल्याने पक्षात अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पक्षाचे गोव्याचे निरीक्षक माणिकराव ठाकरे हे आज गोव्यात येत असून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील भेटणार आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पक्षाचे काम निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चालू आहे. आमची गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर युती आहे. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. पक्षाच्या बैठका देखील लवकरच विविध ठिकाणी होतील. मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.
निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष अद्याप आवश्यक ती तयारी करीत नाही, अशी कैफियत त्यांनी मांडलेली आहे. अलीकडे पक्षाची बैठक होत नाही. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची देखील बैठक होत नाही, याबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. दरम्यान आज माणिकराव ठाकरे काही जणांना भेटण्यासाठी खास गोव्यात येत आहेत. त्यांच्याबरोबर पदाधिकाऱ्यांची बैठक होईल असा अंदाज आहे. पाटकर यांचे म्हणणे आहे की ठाकरे हे काही वेगळ्या कामासाठी गोव्यात येत आहेत. त्यानंतर ते पक्ष कार्यालयात येऊ शकतात, खास बैठक अशी ठेवलेली नाही. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसने निवडणुकीसाठी कोणतीही तयारी केलेली नाही. भारतीय जनता पक्ष सध्या गावागावात तसेच तालुका पातळीवर देखील फार मोठ्या बैठका घेत आहे. त्यांच्या अंतर्गत सभा देखील होतात.
माणिकराव ठाकरे यांना विचारणार जाब
काँग्रेस पक्षाने अद्याप कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे माणिकराव ठाकरे गोव्यात आल्यानंतर त्यांना जाब विचारण्याचा निर्णय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे यांची आजची गोवा भेट देखील फार चर्चेत येण्याची शक्यता वाढली आहे.