For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीची धांदल...बस नियोजनाचे संकट

12:45 PM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीची धांदल   बस नियोजनाचे संकट
Advertisement

400 बसेसच्या मागणीमुळे परिवहनची डोकेदुखी; उन्हाळी हंगामात तीनतेरा

Advertisement

बेळगाव : निवडणूक आयोगाने मतदानासाठी 400 बसेसची मागणी परिवहनकडे केली आहे. त्यामुळे परिवहनची ऐन उन्हाळी हंगामात डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मतदानासाठी बस नियोजनाचे संकट परिवहनसमोर उभे ठाकले आहे. यात्रा-जात्रा, लग्नसराई व शाळांना सुटी पडल्यामुळे प्रवासी संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी परिवहनच्या बसेसची गरज भासणार आहे. दरम्यान, परिवहनकडे 400 बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. मतदानादिवशी यंत्र, साधनसामग्री, पोलीस बंदोबस्त आणि कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी या बसेसचा वापर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी बसचे नियोजन करताना परिवहनची चांगलीच दमछाक होणार आहे. राज्यात 11 जून 2023 पासून शक्ती योजना सुरू झाली आहे. याअंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. परिणामी महिला प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

त्यामुळे मार्गावर बसेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी अनियमित बससेवा सुरू आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या बसेसवरच परिवहनचा डोलारा सुरू आहे. त्यातच निवडणूक आयोगाने मतदानासाठी 400 बसेसची मागणी केली आहे. मतदानासाठी 400 बसेस कोठून द्याव्यात? असा प्रश्नही परिवहनसमोर आहे. आधीच बसेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच मतदानकाळात बसचे नियोजन करताना परिवहनचे तीनतेरा वाजणार आहेत. निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. यासाठी यापूर्वीच 10 बसेस धावू लागल्या आहेत. पुन्हा मतदानादिवशी यंत्रसामग्री, कर्मचारी आणि पोलिसांसाठीही बसेसची गरज भासणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळी हंगामात बस नियोजनाचे संकट परिवहनसमोर कायम आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.