जिल्हा बँकेत इलेक्शन की सिलेक्शन?
जिल्हा बँकेची निवडणूक 19 रोजी : चुरस होणार की समेट याकडे सर्वांचे लक्ष
संकेश्वर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक दि. 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नुकतीच हुक्केरी ग्रामीण विद्युत संघाची निवडणूक पार पडली. यात कत्ती-पाटील पॅनेलने बहुमताने विजय मिळविला. दरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीने होणार की समेट घडणार? याकडे लक्ष लागले आहे. इलेक्शन की सिलेक्शन? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. एकूण 16 जागांसाठी 19 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. 2693 मतदार प्रतिनिधी निवडणार आहेत. 15 जागांसाठी कृषी पत्तीन सहकारी संघातून तर इतर संघ-संस्था, दूध संघ यातून एका प्रतिनिधीची निवड होणार आहे.
सदर संचालकांचा कालावधी पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. पीकेपीएसच्या 1249 पैकी 1190 अधिकृत मतदार आहेत. तर इतर संघ-संस्थांमधून 1444 पैकी 898 अधिकृत मतदार आहेत. दि. 4 ते 11 ऑक्टोबर दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. 12 रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 13 रोजी अर्ज माघार, 14 रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून 19 रोजी बेळगाव येथील बी. के. मॉडेल स्कूलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दि. 6 ऑक्टोबरपर्यंत पीकेपीएसमधून 5 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. तर इतर संघ-संस्थांमधून 1 असे 6 अर्ज दाखल झाले आहेत.
सदर निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कत्ती-जारकीहोळी गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हुक्केरी विद्युत संघाच्या निवडणुकीत कत्ती गटाने बाजी मारली आहे. असे असताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण वरचढ होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. असे असले तरी अंतर्गत खलबते सुरू असून यातून समेट घडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यामुळे सदर निवडणुकीत इलेक्शन होणार की सिलेक्शन? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.