For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडच्या विधानसभाध्यक्षपदी रमणसिंग यांची निवड

06:05 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडच्या विधानसभाध्यक्षपदी रमणसिंग यांची निवड
Advertisement

वृत्तसंस्था / रायपूर

Advertisement

छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रमणसिंग यांची राज्यविधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मंगळवारी छत्तीसगडच्या नव्या विधानसभेच्या प्रथम अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला. गेल्या  रविवारी रमणसिंग यांनी या पदासाठी आपले आवेदन विधानसभेचे सचिव दिनेश शर्मा यांच्याकडे सादर केले. त्यावेळी त्यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री विष्णूदेव साय आणि माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बाघेलही होते.

मंगळवारी अधिवेशनाच्या प्रथम दिनी रमणसिंग यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निर्विरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कोणीही आवेदन सादर न केल्यामुळे त्यांची या पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्याही आमदारांनी त्यांचे यासाठी अभिनंदन केले.

Advertisement

साय यांच्याकडून प्रस्ताव

विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी रमणसिंग यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याला उपमुख्यमंत्री अरुण साव यांनी अनुमोदन दिले. विरोधी पक्षनेते चरणदास महंत यांनीही त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर निर्विरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

 सात वेळा आमदार

रमणसिंग हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. छत्तीसगड हा मध्यप्रदेश राज्याचा भाग होता, तेव्हापासून ते विधानसभेवर निवडून येत आहेत. छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये ते सलगपणे राजनंदगाव या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येत आहेत.

Advertisement
Tags :

.