राज्यसभेच्या चार जागांसाठी 19 जानेवारीला निवडणूक
दिल्लीच्या 3, सिक्कीमच्या एका जागेसाठी वेळापत्रक जाहीर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील तीन आणि सिक्कीममधील एका जागेसाठी 19 जानेवारीला निवडणूक होणार आहे. 2 जानेवारीला अधिसूचना जारी झाल्यानंतर नामांकन प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर उमेदवार 9 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करू शकतात. एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्यास 19 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुऊवात झाल्यानंतर त्याचदिवशी विजयी उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.
आम आदमी पार्टीचे संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि नारायण दास गुप्ता यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जानेवारी 2024 रोजी संपत आहे. याशिवाय, हिशे लाचुंगपा (सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट) यांचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2024 रोजी संपत आहे. या जागांवर ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील राज्यसभेच्या तिन्ही जागांवर आम आदमी पार्टीचा (आप) विजय निश्चित मानला जात आहे. दिल्ली विधानसभेत 70 जागा असून त्यापैकी 62 जागा ‘आप’कडे आहेत, तर भारतीय जनता पक्षांकडे 8 जागा आहेत. आम आदमी पक्षाकडे प्रचंड बहुमत असल्यामुळे यावेळीही या तीन जागांवर आप उमेदवार विजयी होऊ शकतो.
‘आप’चे संजय सिंह 24 जुलैपासून निलंबित
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह न्यायालयीन कोठडीत आहेत. सभागृहातील बेशिस्त वर्तनामुळे 24 जुलैपासून ते राज्यसभेतून निलंबित आहेत.