इलेक्शन फिवर; रोज 3 टन मटनाचा फडशा...
चिकन मागणी 6 टनावर : उमेदवाराकडून जेवनावळ्या, रस्सामंडळे जोमात
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
निवडणूक प्रचाराला आता केवळ चारच दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राबणारी मंडळे व कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी रस्सा मंडळे व जेवनावळींना ऊत आला आहे. त्यामुळे इलेक्शन फिवरमध्ये रोज 3 टन मटन तर 6 टन चिकनचा फडशा पडत आहे. दुपटीने मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
निवडणूक रंगतदार स्थितीत असुन उमेदवारही मंडळे व कार्यकर्त्यांची मनधरणी करत आहेत. सकाळपासून दिवसभर राबणाऱ्या कार्यकर्त्यांची उमेदवारांकडून खास मांसाहारी जेवनाची व्यवस्था केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील भागात जेवनावळ्या, रस्सामंडळांचा बेत आखला जात आहे. यामुळे नेहमीच्या तुलनेत चिकन व मटनाला दुपटीने मागणी वाढली आहे. कार्यकर्त्यांसह गल्लीतील ज्येष्ठ नागरिकांना रोज आमंत्रण दिले जात आहे. हॉटेलस्ही हाऊसफुल झाली असल्याने उमेदवाराला दोन दिवस अगोदरच हॉटेलचे बुकिंग करावे लागत आहे.
आज याचे जेवन, उद्या त्याचे जेवन अशीची चर्चा गल्लोगली व चौकाचौकात सुरू आहे. सोशल मीडियाच्या आधारे जेवनाचे नियोजन केले जात आहे. यासाठी खास माणसांची नेमणूक केली आहे. जेवनासह पेयांचा आस्वादही दिला जात आहे.
मटन, चिकनला दुपटीने मागणी
जिल्ह्यात इतर दिवशी दर रविवारी व बुधवारी एक ते दिड टन चिकन व मटनाची उलाढाल होते. सध्या निवडणुकीच्या काळात याच दिवशी 3 टन मटन व 6 टनाच्यावर चिकनची उलाढाल होत आहे.
अन्य व्यवसायही तेजीत : युवकांना रोजगार
विधानसभेच्या रणधुमाळीसाठी जाहीरसभा, कॉर्नरभा, बैठका, रॅलीने शक्तीप्रदार्शन हेंत आहे. सभेसाठी मंडप व्यावसायालाही अच्छे दिन आले आहेत. व्यावसायिकाडून मजुरांना आगाऊ रक्कम देऊन आणले जात आहे. मोठ्या प्रमाणात बॅनर, पत्रके छपाई केली जात असल्याने प्रिटिंग व्यावसायिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. सभेसाठी लागणाऱ्या खुर्चा, मंडप यांचेही बुकिंग जोमाने होत आहे.
चिकनच्या दरात 50 रुपयांची वाढ
मटनापेक्षा चिकनला दुप्पट मागणी आहे. मटनाचा दर जादा असल्याने उमेदवारालाही परवडणारे नसते. चिकनचा दर मटनापेक्षा तीन पटीने कमी आहे. त्यामुळे अधिकतर उमेदवार चिकनलाच पसंती देत आहेत. मागणी वाढल्यामुळे चिकनच्या दरात किलोमागे 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे.