निवडणूक आयोगाचे पथक झारखंडमध्ये
विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा सुरू
वृत्तसंस्था/ रांची
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे एक शिष्टमंडळ सोमवारी रांची येथे पोहोचले. या पथकामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यास निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. एस. एस. संधू यांचा समावेश आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले हे पथक राजकीय पक्ष, अंमलबजावणी संस्था आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकांदरम्यान निवडणूक आयोगाने 6 राष्ट्रीय आणि 3 प्रादेशिक पक्षांसह 9 पक्षांचे प्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
निवडणूक आयोगाचे अधिकारी सध्या महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोग 23-24 सप्टेंबर रोजी झारखंड आणि 27-28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पोहोचेल, असे सूत्रांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली तयारी पाहता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. दोन्ही राज्यांमध्ये एकाचवेळी विधानसभा निवडणुका घेण्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारीला संपणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत. तर हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून दोन्ही राज्यांमधील निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होतील