For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक आयोगाची मोदी, राहुलना नोटीस

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक आयोगाची मोदी  राहुलना नोटीस
Advertisement

प्रचारातील भाषणातून द्वेष पसरवल्याचा आरोप, भाजप-काँग्रेस पक्षाध्यक्षांकडून 29 एप्रिलपर्यंत मागितले उत्तर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांकडून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मालमत्ता वाटपावरून भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. पंतप्रधान मोदी सतत देशभरात निवडणूक सभा घेत आहेत. या रॅलींमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला. याप्रकरणी निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडे 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 चा हवाला देत पक्षाध्यक्षांना जबाबदार धरले आहे. राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषत: स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक आणि वाढती जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदावरील लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्रचारात भाषा जपून वापरण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Advertisement

विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या अनेक भाषणांवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांनी केला. काही दिवसांपूर्वी  मोदींनी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना  राम मंदिर आणि कर्तारपूर कॉरिडॉरचा उल्लेख केला होता. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील आनंद एस. जोंधळे यांनी फिर्याद दिली होती. निवडणूक आयोगाने या तक्रारींवर गुरुवारी आपला निकाल देताना मोदींनी पिलीभीत रॅलीत कोणत्याही निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे. राम मंदिराच्या उभारणीचा उल्लेख धर्माच्या आधारावर मतांचे आवाहन मानत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अॅड. आनंद जोंधळे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीमध्ये 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिंदू देवता, प्रार्थनास्थळे, शीख पवित्र स्थळे आणि शीख गुरूंच्या नावाने लोकांकडून मते मागितली होती. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला होता. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मालमत्तेच्या वितरणाबाबत राजस्थानच्या बांसवाडा येथे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला होता. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी मुस्लीम समाजावर भाष्य केले होते. मोदींच्या या वक्तव्याविरोधात विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

Advertisement
Tags :

.