निवडणूक आयोगाची केजरीवालांना नोटीस
‘यमुनेच्या पाण्यात विष’ वक्तव्याबाबत विचारणा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी हरियाणा भाजप सरकारवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवत पुरावे देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना यमुना नदीत विषबाधा आणि सामूहिक नरसंहाराचे गंभीर आरोप तथ्यांसह सिद्ध करण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वजनिक सौहार्दाविरुद्ध अशा विधानांना तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते अशा विविध न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर तरतुदींचा उल्लेख निवडणूक आयोगाने केला आहे. केजरीवाल यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे प्रादेशिक गट आणि शेजारील राज्यांमधील रहिवाशांमध्ये शत्रुत्व निर्माण होऊ शकते. तसेच पाण्याची प्रत्यक्ष किंवा कथित कमतरता किंवा उपलब्धता नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका निर्माण होतो, असेही आयोगाने म्हटले आहे. याप्रकरणी तथ्यात्मक आणि कायदेशीर बाबींसह पुराव्याच्या आधारे आयोग प्रकरणाची तपासणी करणार आहे.