निवडणूक आयोग 27-28 ला महाराष्ट्रात
झारखंडलाही भेट देणार : विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या आठवड्यात महाराष्ट्र आणि झारखंडचा दौरा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोग 23-24 सप्टेंबर रोजी झारखंड आणि 27-28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात पोहोचेल, असे सूत्रांनी सांगितले. गेल्यावेळी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारीला संपणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत. तर हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून दोन्ही राज्यांमधील निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होतील.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका शक्य
निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली तयारी पाहता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. दोन्ही राज्यांमध्ये एकाचवेळी विधानसभा निवडणुका घेण्याचे संकेत मिळत आहेत. याचदरम्यान निवडणूक आयोग पुढील आठवड्यात दोन्ही राज्यांचा दौरा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. यासाठी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी हवामान आणि सुरक्षा आवश्यकतांसह अनेक कारणे सांगितली. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीरच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुका नंतर जाहीर केल्या जातील, असे स्पष्ट केले होते. महाराष्ट्रात सध्या पावसाळा सुरू असल्याने मतदारयादी अद्ययावत करण्यास विलंब होत आहे. निवडणूक यादीत सुधारणा करण्याची प्रक्रिया असल्याचा दावाही त्यांनी केला होता.