राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाचं! काका-पुतण्यांच्या संघर्षात पुतण्या सरस
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय, काका-पुतण्यांच्या संघर्षात पुतण्या सरस
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच आहे, असा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानुसार अजित पवार यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळाले आहे. हा शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठाच धक्का असल्याचे मानले जात आहे. मात्र, शरद पवार यांच्यासाठी न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे.
मागच्या वर्षी शिवसेनेच्या संदर्भातही केंद्रीय निवडणूक आयोगाने असाच निर्णय दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा स्वतंत्र गट आहे, असा निर्णय देण्यात आला होता. मूळ शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेंनाच मिळाले होते.
अजित पवार यांना दिलासा
2 जुलै 2023 या दिवशी अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी पक्षाच्या 40 हून अधिक आमदारांसह राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला होता. तसेच या गटाच्या 9 आमदारांचा समावेशही मंत्री म्हणून सरकारमध्ये करण्यात आला होता. अजित पवार यांनी आपला गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असे प्रतिपादन करत पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर अधिकार सांगितला होता.
आयोगासमोर सुनावणी
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. दोन्ही गटांकडून त्यांची कागदपत्रे आणि साक्षीदार आयोगाला सादर करण्यात आले होते. आयोगासमोर एकंदर सहा महिने सुनावणी झाली. त्यानंतर मंगळवारी निर्णय देण्यात आला आहे. या सुनावणीला शरद पवार स्वत: उपस्थित राहिले होते.
शरद पवारांना धक्का
हा निर्णय म्हणजे शरद पवारांना त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून त्यांचेच पक्षावर पूर्ण नियंत्रण होते. या पक्षाने काँग्रेसशी युती करुन महाराष्ट्रात 15 वर्षे सरकार चालविले होते. तसेच 2004 ते 2014 या काळात 10 वर्षे शरद पवार केंद्रात काँग्रेस प्रणित सरकारमध्ये कृषीमंत्री राहिले होते. आता पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह या दोन्ही महत्वाच्या बाबी निसटल्या आहेत. लोकसभा निवडणूक अगदी जवळ आली असताना त्यांना पुन्हा नव्याने त्यांच्या गटाची उभारणी करावी लागणार आहे.
पवारांसमोरचे पर्याय
आता राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्यासमोरच्या पर्यायांची चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ते न्यायालयात धाव घेऊ शकतात. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता शरद पवारांचीही याचिका तेथे पोहचू शकते अशी चर्चा आहे.
पवार गट चिन्ह निवडणार
शरद पवार गट आता आपल्या गटासाठी वेगळे चिन्ह निवडणार आहे, असे या गटाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या गटाला तीन चिन्हांमधून एक चिन्ह निवडावे आज बुधवारी संध्याकाळच्या आत निवडावे लागेल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. काही दिवसांमध्येच राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे पवार यांना चिन्हाची आवश्यकता लागणार आहे. शरद पवार न्यायालयाचा पर्याय निवडणार की नाही ? की ते नव्या गटाचीच उभारणी करणार ही बाबही अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. आगामी तीन ते चार दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल.
आयोगाचा निर्णय त्रिसूत्रीनुसार
आयोगाने कोणाची राष्ट्रवादी पक्ष हे ठरविण्यासाठी शिवसेनेच्या प्रकरणाप्रमाणेच त्रिसूत्रीचा अवलंब केला आहे. या त्रिसूत्रीची तरतूद भारताच्या राज्यघटनेत आहे. त्यानुसार पक्षाची सदस्यसंख्या आणि कार्यकारिणीतील बहुमत हे दोन निकष आधी पडताळले जातात. त्यातून चित्र स्पष्ट होत नसल्यास विधीमंडळातील आमदारांची संख्या कोणाकडे जास्त आहे, त्यावर कोणाचा पक्ष हे ठरविले जाते. हेच सूत्र याहीवेळी लागू करण्यात आल्याचे दिसत आहे, असे तज्ञांचे मत आहे.