निवडणुकीसाठी प्रचारयंत्रणा गतिमान
जाहीर प्रचारासाठी उरले सहा दिवस : बड्या नेत्यांच्या सभांनी वातावरण तापणार
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी अवघे सहा दिवस उरले असल्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक-एक मतासाठी उमेदवारांची धावपळ सुरु आहे. मतदान मिळवण्यासाठी बिनदिक्कतपणे साम, दाम, दंड नितीचा वापर केला जात असून हायटेक यंत्रणेचा खुबीने वापर सुरु आहे. सर्वच प्रमुख पक्षांच्या बड्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्याकडून जाहीर सभांचा धडका सुरु आहे. सभांमध्ये परस्परांवर होणाऱ्या आरोपांमुळे दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागले असून प्रचार यंत्रणा गतिमान झाली आहे. येत्या सहा दिवसांत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उबाठा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापुरात सभा होणार आहेत.
जिह्यातील काही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख तिरंगी, चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होत असली तरी खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होत आहे. अनेक मतदारसंघात अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. परिणामी मतांची विभागणी होणार असल्यामुळे सर्वच उमेदवारांची घालमेल सुरु आहे. त्यामुळे ‘आता नाही तर कधीच नाही‘ या आवेशाने प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. युती आणि आघाडीतील वरीष्ठ नेत्यांच्या सभांमध्ये विरोधकांवर आणि त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणावर जोरदार टिका-टिप्पणी केली जात आहे. तर अपक्ष उमेदवार आपआपल्या ताकदीनुसार प्रचार करत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर आपला निशाणा साधत आहे. औट घटकेचा मतदारराजा मात्र गेले पंधरा दिवस या सर्वांची भाषणे, मनोगते निमुटपणे ऐकत आला असला तरी मतदान कोणाला करायचे याची खुणगाठ मात्र त्याने यापूर्वीच पक्की बांधली आहे.
मेळावे, जाहीर सभा, कोपरा सभा आणि लाऊड स्पिकरद्वारे प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. या सभांमध्ये उमेदवार आणि पक्षाचे नेते युवकांसाठी रोजगार निर्मिती, शैक्षणिक सुविधा, सर्वसामान्यांसाठी आरोग्य सुविधा, लाडक्या बहिणींसाठी अनुदान, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह जिह्याचा विकास करण्याचे आश्वासन दिले जात आहे. युवक ही देशाची शक्ती आहे असा भाषणांमधून उल्लेख करत युवकांना आदर्शवादाचे सल्ले देखील दिले जात आहेत. तर दुसरीकडे आड मार्गाने जेवणावळी सुरु असून त्याच्या जोडीला दारूची बाटली देखील पुरविली जात आहे. त्यामुळे हे उमेदवार आणि नेते एका बाजूला आदर्शवाद सांगत असले तरी मतांच्या अभिलाषेपोटी दारूच्या माध्यमातून पिढी बिघडवण्याचे काम सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरु झाल्यापासून उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये कोट्यावधी रूपयांची दारू जप्त केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान अवैध प्रकारांवर आळा घालण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली असली तरीही छुप्या पध्दतीने हे गैरप्रकार सुरु आहेत. तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते हे सर्व प्रकार करण्यासाठी आघाडीवर आहेत.
शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार अधिक गतिमान आणि आकर्षक करण्यासाठी विविध वाहिन्यांच्या मालिकांमधील आणि चित्रपटामधील सेलिब्रिटीजना आमंत्रित केले आहे. पण नेमके कोणते कलाकार येणार याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी गुप्तता पाळली आहे. जाहीर प्रचार बंद झाल्यानंतर अंतर्गत प्रचार, कुरघोडीच्या राजकारणास वेग येणार आहे. आहे. मतदारांना अमिष दाखवून मतदान आपल्याच पारड्यात कसे पडेल यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना या सहा दिवसांमध्ये डोळयात तेल घालून विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे.