रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून वृद्धेचा मृत्यू
निलजी येथील ऑफिसर्स मेसजवळ अपघात
वार्ताहर/सांबरा
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या निलजी येथील वृद्धेचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. प्रभावती दाजीबा पाटील ऊर्फ मलानी (वय 64) रा. टिळक चौक निलजी असे त्या वृद्धेचे नाव आहे. घटनास्थळावरून व पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, प्रभावती या बाळेकुंद्री खुर्द येथील आठवडी बाजाराला जाऊन गावाकडे येत होत्या. निलजी येथील ऑफिसर्स मेसजवळ रस्ता ओलांडताना सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा इस्पितळाला अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने रात्री त्यांचा मृत्यू झाला. मंगळवार दि. 11 रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार आहे.