डिजिटल अॅरेस्टची भीती दाखवत वृद्धेला 16 लाखांना लुटले
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत डिजिटल अॅरेस्ट करण्याची धमकी देत महांतेशनगर येथील एका वृद्धेकडून भामट्यांनी 16 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी सोमवार दि. 21 रोजी लता नामक 66 वर्षीय वृद्धेने शहर सायबर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे.
फिर्यादी लता यांना ऑगस्ट 2026 मध्ये एका मोबाईलवरून फोन आला. आम्ही सीबीआय अधिकारी बोलत आहोत. तुम्ही तुमचे आधारकार्ड दहशतवाद्यांना 2.5 कोटी रुपयांसाठी विकला आहात, असे म्हणत व्हिडिओ कॉल करून फिर्यादीचे आधारकार्ड दाखवत आम्ही दहशतवाद्याला अटक केली आहे. तुम्ही दहशतवाद्याकडून 2.5 कोटी घेतला आहात. तुम्हाला चौकशी करण्यासाठी अटक करतो असे धमकाविण्यात आले. तुमच्या बँक खात्यातून आम्ही सांगितलेल्या बँक खात्यात पैसे पाठवा. त्याची तपासणी करून पुन्हा तुमच्या बँक खात्यात पैसे वर्ग करतो. तसेच तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो, असे सांगितले.
फिर्यादीने भीतीपोटी 21 ऑगस्ट 2026 रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून 9 लाख रुपये पाठविले. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी पुन्हा 7 लाख रुपये असे एकूण 16 लाख रुपये तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी सोमवारी सीईएन पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. सायबर क्राईम विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. मंटूर यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करून घेत तपास चालविण्यात आला आहे.
धमकीला बळी पडू नका
गेल्या काही वर्षांपासून शहर व परिसरात डिजिटल अॅरेस्टच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कोणीही तोतया अधिकाऱ्यांच्या धमकीला बळी पडू नये, असे आवाहन सातत्याने पोलीस खात्याकडून केले जात असले तरीही अद्याप नागरिकांमध्ये म्हणावी तशी जागृती झाली नसल्याचे दिसून येत आहे.