For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुटलेल्या विजेच्या तारेच्या स्पर्शाने वृद्धेचा जागीच मृत्यू; तणावानंतर वारसांना सहा लाख २० हजारांची मदत

09:21 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
तुटलेल्या विजेच्या तारेच्या स्पर्शाने वृद्धेचा जागीच मृत्यू  तणावानंतर वारसांना सहा लाख २० हजारांची मदत
Advertisement

शिरोळ: ग्रामीण रुग्णालयाजवळील माने गल्ली परिसरात तुटलेल्या वीजतारेचा स्पर्श झाल्याने एका वृद्ध महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रत्नाबाई धोंडीराम माने (वय ७८) यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत निष्काळजीपणाचा आरोप केला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर महावितरणकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाबाई माने या घरातील चूल पेटविण्यासाठी जळण गोळा करत होत्या. त्यावेळी जळणावर पडलेल्या तुटलेल्या वीजतारेचा त्यांच्या हाताला स्पर्श झाला. जोरदार विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सारिका अरविंद माने, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दिग्विजय माने, माजी उपसरपंच गोरखनाथ माने, संदीप माने, शशिकांत माने, अरुण माने, राजू माने, सतीश राजमाने, राहुल माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही तातडीने पाचारण करण्यात आले. नागरिकांनी तुटलेल्या तारांबाबत वेळेवर दुरुस्ती व सुरक्षिततेची उपाययोजना न केल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला.

तणावपूर्ण वातावरणात जयसिंगपूर विभागाचे अभियंता विजय आडके यांनी मृत महिलेच्या कुटुंबीय आणि उपस्थित नागरिकांशी चर्चा केली. महावितरणकडून चार लाख रुपये, कर्मचारी वर्गणीतून दोन लाख रुपये, अंत्यविधीसाठी २० हजार रुपये अशी एकूण ६ लाख २० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस रोजंदारीवर नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर वातावरण निवळले.

Advertisement

रत्नाबाई माने यांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप वृद्ध महिलेचा बळी गेल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिरोळ पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

आमदार माने यांच्या हस्तक्षेपाने यंत्रणा खडबडून जागी
या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. अशोकराव माने यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. गरीब वृद्ध महिलेचा निष्पाप बळी गेल्याने कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement
Tags :

.