Koyna Express मध्ये वृद्ध प्रवाशाचे दागिने लुटले, पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
तारगांव स्टेशन येताच वृध्द महिलेला हिसडा मारुन दागिने काढून घेतले
मिरज : मध्य रेल्वेच्या मिरज-पुणे मार्गावरील तारगांव रेल्वे स्थानकावर कोयना एक्सप्रेस (गाडी क्र. 11029) मध्ये विकलांग बोगीतून महिला प्रवाशाचे दागिने लंपास करण्यात आले. चोरट्यांनी वृध्द दाम्पत्याला लक्ष करत पुणे ते तारगांव स्थानकापर्यंत रेकी करुन ही लुबाडणूक केली.
मिरज लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत 24 तासात चोरीचा छडा लावला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन सराईत चोरट्यांना मसूर येथून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तीन लाख, 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निशिकांत नारायण सुतार व त्यांची पत्नी सौ. रजनी नारायण सुतार हे वृध्द दाम्पत्य कोयना एक्सप्रेसने पुणे ते सांगली असा प्रवास करीत होते. दोघेही रेल्वे इंजिनलगत असलेल्या पहिल्या क्रमांकाच्या विकलांग बोगीत बसले होते.
या दरम्यान, सुमारे 16 ते 17 वर्षे वयाचे दोघे अल्पवयीन तरुणही या बोगीत चढले. पुण्यापासून तारगांव स्थानकापर्यंत संबंधीत तरुण या दाम्पत्याच्या शेजारीच होते. कोयना एक्सप्रेस तारगांव स्टेशनवर आल्यानंतर संशयीत तरुणांनी रजनी सुतार यांना हिसडा मारुन त्यांच्या गळ्यातील 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मणी व तीन ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र असे दागिने चोऊन नेले.
संबंधीत दाम्पत्य आरडाओरडा करत असताना संशयित दोघेही तरुण रेल्वेतून उडी माऊन पळून गेले. त्यानंतर रेल्वे कराड स्थानकावर आल्यानंतर सुतार दाम्पत्याने लोहमार्ग पोलिसांना माहिती देऊन दोघा अनोळखी तरुणांविरुध्द तक्रार दिली.
सदर घटनेची माहिती समजातच मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी काळे यांनी सातारा लोहमार्ग पोलिसांसह दोन पथके घेवून घटनास्थळी धांव घेतली. चोरी करण्याची पध्दत आणि अभिलेखावरील गुन्हेगार याची माहिती घेतली. वृध्द दाम्पत्याची लुबाडणूक करणारे दोघे सराईत चोरटे हे मसूर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मसूरमध्ये छापेमारी करत दोघा अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून चोरीचे दागिने असा तीन लाख, 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघेही अल्पवयीन चोरटे सराईत असून, त्यांच्यावर यापूर्वी मसूर व तळभिड स्थानकावर वेगवेगळी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी संशयीतांना न्यालयासमोर उभे केले असता न्यायालयाने संशयीतांना साताऱ्याच्या बाल निरीक्षण गृहात पाठविण्याचा आदेश दिला आहे.
पुणे ते तारगांव प्रवाशांवर रेकी पोलिसांनी सांगितले की, संशयीत अल्पवयीन दोघे चोरटे हे रेल्वेमध्ये चोरी करणारे सराईत आहेत. ते पुण्यातच कोयना एक्सप्रेसमध्ये चढले. पहिल्या बोगीपासून जनरल बोगीपर्यंत रेकी केली. विकलांग डब्यात वृध्द दाम्पत्य असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर दोघेही विकलांग बोगीत घुसले. विकलांग बोगीत अन्य सामान्य प्रवाशांची संख्या कमी होती. रेल्वे धावत असताना
वृध्दांसोबत त्यांनी जवळीक वाढवली. तारगांव स्टेशन येताच वृध्द महिलेला हिसडा मारुन दागिने काढून घेतले. आरडाओरडा होण्याआधीच दोघेही रेल्वेतून उडी माऊन तारगांव स्टेशनवरुन पळून गेले.
पोलिसांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही : पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ
शासकीय कामात अडथळा आणणारे, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिला आहे. तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.