घराच्या वाटणीवरून कुऱ्हाडीने वृद्धाचा खून
लोणंद :
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालपे (ता. फलटण) येथील सावता सरस्वती काळे (वय 75, रा. सालपे, ता. फलटण) यांचा घराच्या वाटणीवरून डोक्यात कुऱ्हाड व दगड घालून खून करण्यात आला. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सालपे येथील फिर्यादी मिथुन काज्या काळे याचे आजोबा सावता सरस्वती काळे यांचा फिर्यादीचे सावत्र भाऊ दत्ता काज्या काळे, महेश राजा काळे (दोघे रा. सालपे ता. फलटण), तसेच दत्ता काळे यांचा सासरा अमित लवच्या शिंदे (वय : 35 वर्ष) रा. मोळ ता. खटाव यांनी घराच्या वाटणीवरून असलेल्या वादातून आपापसात संगनमत करून सोमवार दि. 30 रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मयत सावता काळे यांना अमित शिंदे याने हाताने धरले तर दत्ता काळे याने हातातील कुऱ्हाडीने सावता काळे यांच्या डोक्यात घाव घालून गंभीर जखमी केले व महेश काळे याने दगड फेकून मारून सावता काळे यांचा खून केला अशी फिर्याद मिथुन काळे याने लोणंद पोलिसांत दाखल केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी घटनास्थळावर भेट देत तपास सुरू करत गुन्ह्यातील आरोपी महेश काज्या काळे व अमित लवच्या काळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर सातारा येथून फॉरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा अधिक तपास सुशील भोसले हे करीत आहेत.