तलवार हल्ल्यातील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
शिंगणापूर (ता. करवीर) येथे घटना
करवीर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर
शिंगणापूर (ता. करवीर) येथील पुरग्रस्त कॉलनीमध्ये कौटुंबिक कारणातून गेल्या आठवड्यात सदाशिव रामचंद्र तोरस्कर (वय ७८) आणि त्यांच्या नातू तायकांदो प्रशिक्षक रितेश राजेंद्र तोरस्कर (वय २३, रा. इंडिया ग्रुप मंडळाशेजारी, पुरग्रस्त कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर) या दोघांना तलवारीने हल्ला करून, गंभीर जखमी करण्यात आले होते. या हल्ल्यातील गंभीर जखमी सदाशिव तोरस्कर या वयोवृध्दाचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री सीपीआरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी मृत सदाशिव तोरस्कर यांचा मुलगा राजेंद्र सदाशिव तोरस्कर (वय ५२, रा. इंडिया ग्रुप मंडळाशेजारी, पुरग्रस्त कॉलनी, शिंगणापूर, ता. करवीर) याच्या विरोधी करवीर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
रितेश तोरस्कर यांचे वडील आणि संशयीत राजेंद्र तोरस्कर याच्यामध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला होता. या वादापासून रितेश कोल्हापुरात राहत आहे. तो गावच्या यात्रेनिमित्ताने २५ फेब्रुवारी रोजी शिंगणापूरला आला होता. रात्री तो आजोबाच्या घरी झोपण्यासाठी आला. त्यावेळी संशयित राजेंद्र तोरस्कर आणि रितेश या पितापुत्रामध्ये शाब्दिक वाद उफाळून आला. यावेळी वयोवृध्द सदाशिव तोरस्कर यांनी संशयित मुलगा राजेंद्र तोरस्करला भांडणाबाबत जाब विचारला. याचा त्याला राग आल्याने, त्याने चिडून वयोवृध्द वडिलांना शिवीगाळ करीत, तुला आता मारून टाकतो, अशी धमकी देत, त्यांच्या डोक्यात तलवार मारली. तलवारीचा वार वर्मी बसल्याने, ते गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या मदतीला त्यांचा नातू रितेश धावू आला. त्याच्याही तलवारीच्या मागील मुठीने डोक्यात मारून जखमी करून, त्यांच्या हाताला आणि छातीला चावून गंभीर दुखापत केली.
या हल्ल्यात संशयीत राजेंद्र तोरस्कर हा सुध्दा जखमी झाला. या तिघा जखमींना उपचारासाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले आहे. सदाशिव तोरस्कर यांची प्रकृती नाजूक बनल्याने, त्यांच्यावर सीपीआरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. ते गेल्या आठ दिवसापासून मृत्युशी झुंज देत होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची झुंज अपयशी ठरल्याने, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी करवीर पोलिसात संशयीत राजेंद्र तोरस्कर याच्या विरोधी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.