महांतेशनगर येथील वृद्धाला 3 लाखांचा गंडा
पेन्शन सुरू करण्याचे सांगत केली फसवणूक
► त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
पाच लाख रुपये गुंतवा, दरमहा 50 ते 60 हजार रुपये पेन्शन मिळवा, असे सांगत महांतेशनगर येथील एका वृद्धाला सायबर गुन्हेगारांनी 3 लाख रुपयांना ठकवले आहे. यासंबंधी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
महांतेशनगर येथील 64 वर्षीय विनोदकुमार यांची फसवणूक झाली आहे. 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता फेसबुकवर त्यांनी एक व्हिडिओ पाहिला. सुधामूर्ती व केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘गुंतवणूक करा, वृद्धापवेतन मिळवा’ असे आवाहन केल्याचा तो व्हीडिओ होता. त्या लिंकवर क्लिक करताच एका टेलिग्राम ग्रुपमध्ये विनोदकुमार यांचा मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्यात आला.
15008 रुपये भरून सदस्यत्व नोंदणी करण्यास सांगण्यात आले. त्यांच्या सांगण्यावरून विनोदकुमार यांनी ती रक्कम भरून सदस्यत्वही घेतले. दि. 7 सप्टेंबर रोजी त्यांना व्हॉट्सअप कॉल आला. 5 लाख रुपये भरा, दरमहा 50 ते 60 हजार रुपये पेन्शन मिळवा, असे सांगण्यात आले. रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतही देण्यात आली. 9 सप्टेंबर रोजी 3 लाख 14 हजार 581 रुपये फोन पे व एनइएफटीच्या माध्यमातून पाठविण्यात आले. त्यानंतर पेन्शन किंवा परतावा तर नाहीच गुंतवलेले पैसेही सायबर गुन्हेगारांनी परत दिले नाहीत.
