पाय घसरून ओहोळात पडल्याने तळवडेतील वृद्धाचा मृत्यू
न्हावेली/वार्ताहर
तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी सखाराम सोनु कुंभार (७०)हे मासे पकडण्यासाठी ओहोळात गेले असता पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेने तळवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी असलेले सखाराम सोनु कुंभार हे रविवार किंवा सोमवारी मासे पकडण्यासाठी तळवडे परिसरातील एका ओहोळामध्ये गेले होते.मासे पकडण्याच्या प्रयत्नात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते ओहोळाच्या पाण्यात पडून बुडाले. सखाराम कुंभार बराच वेळ घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली.अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर अखेर काल सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह ओहोळात आढळून आला.या घटनेमुळे कुंभार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी पंचनामा केला.आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.या प्रकरणी सावंतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.सखाराम कुंभार यांच्या दुदैवी निधनामुळे तळवडे कुंभारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.