माडलगीत वृद्ध पतीकडून पत्नीचा खून
चारित्र्याच्या संशयाने घटना : पोलिसांकडून पतीला अटक
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
चारित्र्याच्या संशयावरून वृद्ध पतीने विळ्याने मानेवर वार करून आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील माडलगी येथे घडली आहे. याप्रकरणी रायबाग पोलिसांनी पतीला अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
कल्लव्वा सदाशिव मरडी (वय 55, रा. माडलगी-मारडी) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पती सदाशिव रामा ऊर्फ रामप्पा मरडी (वय 67, रा. माडलगी) याला अटक करण्यात आली आहे. गुरुवार दि. 1 ऑक्टोबरच्या सायंकाळी ही घटना घडली आहे. खुनाच्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी कल्लव्वा जनावरांना गवत आणण्यासाठी आपल्याच शेतजमिनीत गेली होती. हीच संधी साधून सदाशिवने उसाच्या फडात विळ्याने मानेवर वार करून आपल्या पत्नीचा खून केला आहे. खुनानंतर तो उसाच्या फडातच लपून बसला होता. यासंबंधी कल्लव्वाचा मुलगा चिक्कय्या याने रायबाग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
पत्नीवरील संशयामुळे सदाशिव काही महिन्यांपासून वेगळे राहात होता. आपल्याला जेवायला वाढत नाही. फोनही करीत नाही, असे सांगत सदाशिव कल्लव्वाला छळत होता. शेवटी तिच्यावरील संशय वाढल्याने उसाच्या फडात त्याने आपल्या पत्नीचा काटा काढला आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे पोलीस निरीक्षक एम. एम. डप्पीन, उपनिरीक्षक नंदीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदाशिवला अटक केली आहे.