For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एल्डर हेल्पलाईनवर मांडा मोकळेपणाने व्यथा, ज्येष्ठ व्यक्तींना ऑनलाईन मदतीचा आधार

04:54 PM Sep 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
एल्डर हेल्पलाईनवर मांडा मोकळेपणाने व्यथा  ज्येष्ठ व्यक्तींना ऑनलाईन मदतीचा आधार
Advertisement

राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले

Advertisement

कोल्हापूर : घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे, नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय, कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही, अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी ज्येष्ठ नागरिक एल्डर लाईन हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत. ऑगस्ट 2021 पासून सुरु झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले.

30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत झाली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन कार्यरत आहे. जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. मानवसेवा हीच ईश्वर सेवा“ हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा (एमडी) यांच्या मार्गदर्शनाखाली 37 वर्षांपासून सेवा सुरु आहे.

Advertisement

विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, गरीब मुले, मुली आणि महिला यांची सेवा ही संस्था करीत आहे. जनसेवा फाउंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. एल्डरलाईन 14567 ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे.

या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात. त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरुक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसेवा फाउंडेशन मार्फत करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.