For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय मंत्री अमित शहांच्या गोवा दौऱ्याची कडक तयारी

06:57 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय मंत्री अमित शहांच्या गोवा दौऱ्याची कडक तयारी
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतला उच्चस्तरीय सुरक्षेचा आढावा!

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 6 व 7 सप्टेंबर रोजी गोव्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. गृहमंत्र्यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील असल्याने, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी मंत्रालयात गोवा सरकारच्या सर्व संबंधित सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच पोलिस प्रशासनाची उच्चस्तरीय बैठक घेतली.

Advertisement

बैठकीत अमित शहा यांच्या व्ही. आय. पी. सुरक्षेसह अंतर्गत वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजित शासकीय व राजकीय कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गृहमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान गोव्यात कडक त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळांपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर आणि गोव्याच्या सीमांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रीय सुरक्षा दलांशी समन्वय ठेवून सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्याच्या हालचालींमुळे गोव्यातील स्थानिक नागरिक, आणि पर्यटकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. वाहतूक पोलिसांनी मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार ‘व्ही.आय.पी. कॉरिडॉर’ आणि पर्यायी मार्ग निश्चित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तीन कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार गृहमंत्री

आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन, पश्चिम क्षेत्रीय परिषदेची बैठक आणि गोवा पोलिसांच्या प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रपती निशाण’ सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे सर्व कार्यक्रम विनाअडथळा पार पडावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज विभाग, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि सर्व परवानग्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.