एकनाथ शिंदेंची सरकारमध्ये कोंडी
खासदार संजय राऊत यांचा आरोप : सरकार एकसंघ नसून परस्परावर कुरघोड्या
प्रतिनिधी / मुंबई
महाराष्ट्रातील सरकार हे एकसंघ नसून ते परस्परावर कुरघोड्या करत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर भाजपने संपवल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट एकाकी पडला आहे. या अगोदर नुकतेच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना जवळ येण्यावर भाष्य केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. यातच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदेसेनेवर निशाणा साधल्याने मंत्री नीतेश राणे आणि खासदार रामदास कदम यांनीही रविवारी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेना खड्या सारखे बाजूला केले. यामुळे शिंदे यांची सरकारमध्ये केंडी झाली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. जरी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद आणि त्यांच्या गटाला काही मंत्रिपदे दिली तरी शिंदे यांची सध्याची बॉडी लँग्वेज ते शून्यात असल्याच समजते असेही राऊत यांनी म्हटले आहे.
जो पर्यंत पैसा तो पर्यंत लोक जातात
जो पर्यंत पैसा आहे तो पर्यंत लोक जातील, अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली. तसेच बजेटवर बोलताना बजेट निवडणूक असलेल्या राज्यांसाठी आहे. अनाकलानीय किंवा लोकांनी आनंदित व्हावे असे बजेटमध्ये काही नाही. भाजपचे अंधभक्त उड्या मारत आहेत, अशी टीका केली.
शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण
सरकारमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे. त्यांच्या पक्षाच्या एका गटावर फडणवीसांचे नियंत्रण आहे. किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण आहे. ते आमदार देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या सांगण्यावर सुरतला गेले होते, एकनाथ शिंदेंसाठी नाही. उरलेले लोक चलबिचल आहेत. आपल्याला नेतफत्व नाही, आपण पुन्हा मागे फिरायचे का? असा विचार सुऊ आहे, असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
अन्यथा संजय शिरसाठ यांचा संजय राऊत होईल : नीतेश राणे
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे मोठे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केले. आता याच मुद्द्यांवरून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नीतेश राणे यांनी संजय शिरसाट यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावी, असा सल्ला दिला होता. दरम्यान संजय शिरसाट आमचे मित्र आहे त्यांचा संजय राऊत होऊ नये इतकीच अपेक्षा. असे ते यावेळी म्हणाले.
काळीजादू काय असते हे ठाकरेंना विचारावे : रामदास कदम
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत, याचे उत्तर काळ्या जादूवाल्याने द्यावे. माझ्या नादाला लागू नका, असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी समाचार घेतला आहे. काळया जादूबद्दल बोलू नका. काळी जादू काय असते हे उद्धव ठाकरे यांनाच विचारा, असे म्हणतानाच उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबू सापडले होते, तसे एकनाथ शिंदे यांनीच सांगितलं होते, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.