Satara News: 'एकमेकांशी पटेना अन् राजकीय करमेना', महायुतीतील सेना आक्रमक
महायुतीतील DCM एकनाथ शिंदे गटाची शिवसेना जावळीत आक्रमक झाली
मेढा : जावळी तालुक्यातील महायुती म्हणजे 'एकमेकांशी पटेना आणि राजकीय करमेना' अशी गत झाली आहे. तालुक्यात काळ्या यादीत नाव टाकण्यास लायक असलेले काही मर्जीतील ठेकेदारीच्या निकृष्ट कामांमुळे महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना जावळीत आक्रमक झाली आहे.
थेट आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी दिला आहे. विकास नेमका जनतेचा की ठेकेदारांचा? याचा जाब विचारण्याची वेळ आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या जावळी तालुक्यातील जनतेने नेहमीच सत्ताधाऱ्यांना साथ दिलेली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नेहमीच विकासकामांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. पण त्यांचे काही कार्यकर्ते जावळीला दुजाभाव करीत आहेत. त्यामुळे आता जावळीतील नवी पिढी आक्रमक झाली आहे. सध्या सातारा येथून रिमोट कंट्रोल करणारे स्वयंभू नेते विकास कामाचे टेंडर निघाल्यानंतर ठेकेदारांची नावे सुचवत आहेत.
त्यामुळे आखेगणी बनवडी, आनेवाडी ते मोरघर खिंड, म्हसवे-सरताळे, आलेवाडी खिंड-मेढा, पाचगणी करहर-कुडाळ-पाचवड आणि सातारा बामणोली, रानगेघर करंडी, भालेकर ते मार्ली, आखाडे फाटा ते रुईघर
या रस्त्यांची कामे घाईगडबडीत झाली आहेत. सध्या कठडे तुटले आहेत. रस्त्यात खट्टे पडले आहेत.
छोटे-मोठे अपघात वाढले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर नक्षीकाम केल्यासारखी डबकी दिसू लागलेली आहेत. काही ठेकेदार म्हणजेच निष्ठावंत कार्यकर्ता असे समीकरण झाले आहे. पूर्वी जावळी तालुक्यात उत्कृष्ट काम करून काही ठेकेदारांनी आजही आपला नावलौकिक कायम ठेवला आहे.
सर्वच ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत नसले, तरी काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ठेकेदार नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी दलालांच्या मार्गे कामे मिळवण्यासाठी संपर्क साधत आहेत. हेच दलाल आता जावळीकरांसाठी काळ ठरले आहेत. त्यांना जाब विचारण्यासाठी आता शिवसैनिकच आक्रमक झाले आहेत.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, विष्णु बेलोशे, सतीश पवार, रोहिदास चिकणे, शांताराम कदम, संजय सुर्वे, दीपक शिंदे, लालसिंग शिंदे, श्रीराम गलगले, सचिन शेलार, अशोक भोसले, शशिकांत आखाडे अशी फौज आंदोलनासाठी आखणी करू लागलेली आहे.
वाहनचालकांच्याही तक्रारी वाढू लागल्या आहेत. अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबतही आवाज उठवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही संदीप पवार यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे विकास निधी व रस्ता दुरुस्तीबाबत त्यांची भूमिका समजू शकली नाही.
अन्यथा लोकशाही मार्गाने प्रहार
आपल्याच हातून आपल्या पायावर धोंडा मारून घेणे कदापि शक्य नाही याची आता त्यांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे जावळीकरांच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी शिवसैनिकच धावून आलेला आहे. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेचा उद्रेक होण्यापूर्वी सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने लोकशाही मार्गाने प्रहार केला जाईल, असा इशाराही संदीप पवार यांनी इशारा दिला आहे.