एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
सरकार स्थापनेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विद्यमान महायुती सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला. या कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. राज्यपालांनी तिघांचेही राजीनामे स्वीकारले आहेत. मात्र नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडेच सोपविली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाल्याने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होणार याबाबत राज्यातील जनतेला उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र राज्याची 14 वी विधानसभा विसर्जित झाली आहे.