Eknath Shinde | एकनाथ शिंदे लेना बँक नाही, देना बँक आहे ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना डिवचलं
सातारा जिल्ह्यात लवकरच शिवसेनेचा वटवृक्ष उभा राहील : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा : “सातारा जिल्ह्यात लवकरच शिवसेनेचा वटवृक्ष उभा राहील,” असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. साताऱ्यातील शिवसैनिकांच्या प्रचंड उत्साहाने भारावून जाऊन ते म्हणाले “माझ्या शिवसैनिकांवर आणि माझ्या भारत देशातील सैनिकांवर मला सार्थ अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर आम्ही चाललो आहोत. आमचं सरकार विकासाचं आणि जनतेच्या हिताचं आहे.”
शिंदे म्हणाले, “2019 साली उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्नाला धोका दिला, पण आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन वेगळा मार्ग निवडला. आज महाराष्ट्रात महायुतीचे 232 आमदार हे जनतेच्या विश्वासाचं प्रतिक आहे.”
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, “शिवसेना आता जनतेच्या हृदयात पुन्हा रुजतेय. सांगलीत पैलवानांचा चंद्रहार पक्षात दाखल झाला आहे. आता आमच्याकडे पैलवानांची कमी नाही.” विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “साडेतीन वर्षं विरोधकांचे हंबरडे आम्ही ऐकतोय; आता त्यांचे कंबरडे मोडलेत. एकनाथ शिंदे लेना बँक नाही, देना बँक आहे.”
शिंदे यांनी पूरपरिस्थिती, शेतकरी मदत, आणि विकास योजनांचा उल्लेख करत सांगितलं, “आम्ही केवळ निर्णय घेत नाही, घटनास्थळी जाऊन काम करतो. महाराष्ट्रासाठी मी २२ तास काम करतो, फक्त २ तास आराम.”
आगामी निवडणुकांकडे लक्ष वेधत शिंदे म्हणाले, “ही निवडणूक नेत्यांची नाही, कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. विरोधक कपटी आहेत, पण जनतेचा पाया आमच्याबरोबर आहे.”
शेवटी शिंदे म्हणाले, “माझ्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आहे. तुम्ही किती संपत्ती कमावली हे महत्त्वाचं नाही, माणसं किती कमावली हे महत्त्वाचं आहे, आणि मी माणसं कमवली आहेत.” यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हलच्या आयोजनाचीही घोषणा यावेळी केली.