Eknath Shinde यांची 'द काश्मीर फाईल', एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न
भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या "द काश्मीर फाईल्स"चे पडसाद राज्याच्या राजकीय पटलावर उमटत राहण्याचीच शक्यता
By : संतोष पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी श्रीनगरला भेट दिली. त्यांनी 845 हून अधिक पर्यटकांची सुटका करून त्यांना विमानाने महाराष्ट्रात परत आणल्याचे स्पष्ट केले. यावर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरमधील पर्यटकांना सुखरुप आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन काश्मीरमध्ये तळ ठोकून असल्याचे सांगितले. 800 पेक्षा अधिक प्रवाशांना परत आणल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले. यात कुठेही एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख नव्हता.
शिंदे यांचा काश्मीर दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्याची खेळी म्हणूनही पाहिले जात असतानाच सीएमओने पहिला झटका दिला. भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या "द काश्मीर फाईल्स"चे पडसाद राज्याच्या राजकीय पटलावर उमटत राहण्याचीच शक्यता अधिक आहे. एकनाथ शिंदे यांचा काश्मीर दौरा हा सामाजिक संवेदनशीलता आणि राजकीय रणनीती यांचा संगम दर्शवतो, असे चित्र त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडायाद्वारे रंगवले.
खासदार नरेश म्हस्के यांनी आतापर्यंत कधीही विमानात न बसलेल्यांना शिंदे यांनी विमानात बसवून आणल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हस्के यांना खडे बोल सुनावले. काश्मीरमधील 845 पर्यटकांना आपण सुखरुप घरी आणल्याचा दावा करत एकनाथ शिंदे यांनी माणुसकी धर्म सोडणार नाही. कोणीही किती टीका करु देत, आपत्तीग्रस्तांचा आक्रोश मला खूप लांबून ऐकायला येतो. दालनात बसून आदेश सोडण्याचा माझा स्वभाव नाही. चिपळूण असो, महाड असो, केरळ असो वा उत्तराखंड जिथे आपत्ती तिथे मी मदतीसाठी तत्पर जातो.
आपत्ती काळात कपड्यांची इस्त्री सांभाळत बसून राहणे पसंद नाही, असे विरोधकांच्या टीकेवर आणि कृतीवर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पर्यटकांशी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधत त्याच्या क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल करत, ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्पर्धा
अजित पवार यांनी अर्थखात्यासह राजकीय रणनीतींवर लक्ष केंद्रित केले आहे. शिंदे यांचा हा दौरा पवार यांच्या तुलनेत भावनिक आणि लोकाभिमुख ठरला. पवार यांच्यावर सातत्याने होणारी टीका आणि त्यांच्या राजकीय बंडाची पार्श्वभूमी यामुळे शिंदे यांना सामान्य जनतेच्या सहानुभूतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न काही प्रमाणात सफल झाला असेच म्हणावे लागेल. दरम्यान, उद्धव ठाकरे गट या दौऱ्याला ‘प्रचारबाजी’ म्हणून टीका करत आहे.
काश्मीर दौऱ्याचे राजकीय संदर्भ
1. नेतृत्वाची संधी : काश्मीर दौरा हा शिंदे यांच्या नेतृत्वक्षमतेचा आणि जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या शैलीला दीर्घकाळानंतर उजाळा देणारा ठरला. महायुती सरकारमध्ये फडणवीस आणि पवार यांच्या प्रभावाखाली शिंदे यांचे स्थान काहीसे मागे पडत असल्याच्या चर्चेदरम्यान, या दौऱ्याने त्यांना पुन्हा मेनस्ट्रिम मीडियाच्या चर्चेत आणले.
2 महायुतीतील अंतर्गत स्पर्धा : महायुती सरकारमध्ये फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद आणि पवार यांचे अर्थखात्यासारखे महत्त्वाचे पद यामुळे शिंदे यांचे राजकीय वजन कमी होत असल्याची चर्चा होती. दौऱ्याच्या निमित्ताने आपली स्वायत्तता कायम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
महायुतीतील नाराजीचा संदर्भ
शिंदे यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील कारभाराबाबत तक्रारी केल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे आणि महायुतीतील तणाव उघड झाला. काश्मीर दौरा हा राज्यातील महायुतीच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे आव्हान देण्याचा प्रयत्न असू शकतो. शिंदे यांच्या दौऱ्याला केंद्रस्थ नेतृत्वाचा पाठिंबा असावा, त्याशिवाय हा दौरा यशस्वी होणे अशक्य असल्याचे मानले जाते. शिंदे यांची प्रतिमा वधारण्यासह स्वायत्तपणा दर्शवण्यासाठी अदृश्य राजकीय शक्ती पाठीमागे असल्याचाही एक निष्कर्ष आहे.