जांबोटी वाडा येथे 26 रोजी होणार ‘एकच प्याला’
शिवस्मारक उभारणीच्या मदतीसाठी नाट्याप्रयोग
खानापूर : जांबोटी वाडा येथे शिवस्मारक उभारण्यात येत असून या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. यासाठी स्मारकाचे बांधकाम हाती घेतले आहे. स्मारकाच्या चौथऱ्यात भव्य असे वाचनालय निर्माण करण्यात येणार आहे. यात सर्वप्रकारची ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरुन सर्वांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी आर्थिक मदतीसाठी जांबोटी येथील स्थानिक कलाकारांचा ‘एकच प्याला’ या नाटकाचा नाट्याप्रयोग दि. 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती धनश्री सरदेसाई यांनी दिली. यावेळी महेश सडेकर, सुरेश कळळेकर, गोविंद पाटील, चंद्रकांत देसाई हे उपस्थित होते.
माहिती देताना पुढे धनश्री सरदेसाई म्हणाल्या, पश्चिम भागात दीडशे वर्षापूर्वीपासून नाट्यापरंपरा जोपासली गेली आहे. स्थानिक कलाकारच आपली कला नाटकातून सादर करत आहेत. आजही आधुनिक काळात ही परंपरा जोपासली गेली आहे. मात्र या कलाकाराना जिल्हा आणि राज्य पातळीवर आपली कला सादर करण्यासाठी वाव मिळालेला नाही. जांबोटी येथील कलाकारानी एकच प्यालासारखे संगीत नाटक दहावेळा सादर केलेले आहेत. येत्या 26 एप्रिल रोजी येथील शुंभम गार्डन येथे दुपारी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा नाट्याप्रयोग सादर केला जाणार आहे. यावेळी बोलताना महेश सडेकर म्हणाले, एकच प्यालासारखा सामाजिक आशय असलेला नाटक आम्ही दहावेळा सादर केलेला आहे. पुन्हा तालुका पातळीवर हा नाटक सादर करणार आहोत. यासाठी आम्हाला नाट्याप्रेमी तसेच शिवप्रेमीनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.