दोन्ही डावांत पाच बळी मिळविणारा एजाज न्यूझीलंडचा तिसरा स्पिनर
क्रिकेटच्या इतिहासात,अनेक फिरकीपटूंनी एकाच कसोटी सामन्यात दोनदा पाच बळी घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. डॅनियल व्हेटोरी, मिचेल सँटनर आणि एजाज पटेल या न्यूझीलंडच्या फिरकीपटूंचा त्यात समावेश होतो. त्यांनी अशा कामगिरीसह विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव कोरले आहे.
न्यूझीलंडच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या डॅनियल व्हेटोरीने आपल्या शानदार कारकिर्दीत दोनदा ही कामगिरी केली. पहिला प्रसंग 2000 मध्ये ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध नोंदला गेला. त्या सामन्यात व्हेटोरीने आपले गोलंदाजी कौशल्य दाखवून पहिल्या डावात 62 धावांत 5 बळी घेतले आणि त्यानंतर दुसऱ्या डावात 87 धावांत 7 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सतत दडपणाखाली ठेवण्याकामी त्याची कामगिरी मोलाची ठरली. व्हेटोरीची अशी दुसरी कामगिरी बांगलादेशविऊद्ध 2004 मध्ये चट्टोग्राम येथे झाली. त्याने तेथे पहिल्या डावात 70 धावांत 6 आणि दुसऱ्या डावात 100 धावांत 6 बळी घेतले.
यंदा पुण्यात भारताविऊद्धच्या शानदार कामगिरीसह मिचेल सँटनर या यादीत सामील झाला. सँटनरच्या डावखुऱ्या फिरकीने भारतीय फलंदाजांना चकित केले आणि त्याने पहिल्या डावात 53 धावांत 7 बळी घेत परिस्थितीचा फायदा उठवण्याची क्षमता दाखवून दिली. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात 104 धावांत 6 बळी मिळवून आपले वर्चस्व कायम ठेवले.
एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर भारताविऊद्ध केलेल्या विलक्षण कामगिरीने त्याला या यादीत स्थान मिळवून दिले आहे. त्याने पहिल्या डावात 103 धावांत 5 बळी मिळविल्यानंतर दुसऱ्या डावात 57 धावांत 6 गडी बाद करून सातत्य दाखवले.